Pune District: मुलांच्या हातात मोबाइलऐवजी पुस्तके द्या

चाकण : पुढील पिढी सुसंस्कारित करायची असेल, तर पालकांनी मुलांच्या हातात मोबाईल न देता पुस्तके द्यावीत, पुस्तकांचे वाचन करून घ्यावे, त्यासाठी प्रथम घरातील मोठ्या माणसांनी पुस्तक वाचणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते यांनी नाणेकरवाडी, चाकण येथे केले.
पुणे जिल्हा ग्रंथालय संघ व पुणे विभाग ग्रंथालय संघ, पुणे यांचे एक दिवसीय संयुक्त अधिवेशन आणि संतभारती ग्रंथालयाचा रौप्य महोत्सव सोहळा ग्रंथदिंडी, ग्रंथ प्रकाशन, व्याख्यान, कीर्तनकार सन्मान व साहित्यिक पुरस्कार आदी विविध उपक्रमांनी चाकणमध्ये उत्साहात संपन्न झाला, त्यावेळी मोहिते पाटील बोलत होते. संतभारती ग्रंथालयाच्यावतीने खेड तालुक्यातील ज्येष्ठ साहित्यिक, लेखक, कवी, उद्योजक, शाळा, उत्कृष्ट वाचक, ग्रंथ भेट देणारे दानशूर, गावातील कीर्तनकार यांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
राणुबाईमळा शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षिका सुनीता मुंगसे यांच्या मार्गदर्शनाखाली पारंपरिक वारकरी वेशभूषा परिधान करून टाळ मृदंगाच्या गजरात ग्रंथदिंडी काढून कार्यक्रमाची सुरुवात झाली. ग्रंथालयाचे रौप्य महोत्सावाचे औचित्य साधून पुणे जिल्हा पत्रकार व ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष हनुमंत देवकर यांनी आपल्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावरील जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या मंदिरासाठी एक लाखाचा धनादेश विश्वस्त जगन्नाथ नाटक पाटील यांच्याकडे सुपूर्द केला.





