पुणे जिल्हा : नवरात्रौत्सवात यंदा गावरान रताळींचेच ‘मार्केट’

मार्केटयार्डात मोठी आवक : मागील वर्षीच्या तुलनेत भाव घटले
पुणे – नवरात्रीमुळे मार्केट यार्डात रताळींची आवक सुरू झाली आहे. यंदा रताळींची मोठी आवक होत आहे. त्यामुळे भावात मागील वर्षीच्या तुलनेत घट झाली आहे. घाऊक बाजारात गेल्या वर्षी किलोला 35 ते 40 रुपये भाव मिळत होता. तो यंदा 20 ते 30 रुपये मिळत आहे. किरकोळ बाजारात 40 ते 60 रुपये किलो भावाने विक्री होत आहे.
नवरात्रौत्सवात काही भाविक नऊ दिवस उपवास करतात. त्यामुळे या कालावधीत मोठी रताळींची आवक होत असते. पुण्यातील बाजारात सातारा जिल्ह्यातील कराड, मलकापूर भागातून आवक होत आहे. गेल्या वर्षी कमी झालेली लागवड आणि मुसळधार पावसामुळे नुकसान झाल्याचा परिणाम रताळी पिकावर झाला होता.
परिणामी, फक्त 1,100 पोती रताळींची आवक झाली होती. मात्र, यंदा आठ दिवसांपूर्वीपासूनच आवक सुरू झाली आहे. दररोज 70 ते 80 टन आवक होत आहे. त्यामुळे कमी भाव मिळत असल्याचे मार्केट यार्डातील व्यापारी अमोल घुले यांनी सांगितले. मात्र, येत्या तीन चार दिवसात ही आवक वाढणार आहे. भावातही 5 ते 10 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.
नवरात्रौत्सवातील उपवासाच्या पार्श्वभूमीवर मार्केट यार्डात रताळींची आवक होत आहे. उत्पादन चांगले झाल्यामुळे यंदा मोठी आवक होत आहे. परिणामी, गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी भाव मिळत आहे. स्थानिक मालालाच कमी भाव मिळत असल्याने यंदा कर्नाटक भागातून रताळींची आवक झालेली नाही.
– अमोल घुले, व्यापारी, मार्केट यार्ड
गावरानची वैशिष्ट्ये
साताऱ्यातील कराड, मलकापूर भागातून येणारी रताळी गावरान असतात. आकाराने लहान, चवीला गोड आणि त्यांची प्रतवारी चांगली असते. त्यामुळे या रताळींनाच नागरिकांकडून जास्त मागणी असते.





