पुणे जिल्हा : विठूनामाचा गजर करीत माऊलींना दिला भावपूर्ण निरोप

वाल्हे – पंढरीच्या विठुरायाला भेटण्यासाठी आतुरलेले वारकरी भागवत धर्माची पताका उंचावित, टाळ-मृदंग, चिपळ्यांचा नाद करीत, भगवंताला साद घालत, सावळ्या विठोबाच्या दर्शनाची आस मनी धरुन वैष्णवांची मांदयाळी….हरि नामाचा जयघोष व ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम, तुकारामच्या नामघोषात, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने शनिवार (दि. ६) सकाळी साडेसहा वाजता वाल्हे (ता.पुरंदर) येथून, पुढील मुक्कामी लोणंदकडे प्रस्थान ठेवले.
सकाळच्या मंगलमय वातावरणात, रिमझीम पाऊसांच्या सरी झेलत, वाल्हेकरांनी माउलींच्या पालखीला भावपूर्ण निरोप दिला. भगव्या पताका उंचावत, टाळ-मृदंगाच्या गजरात श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आषाढी वारीसाठी वाल्हे येथून पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाला. यावेळी, लाखो वैष्णवांसह ग्रामस्थांनी हरिनामाचा गजर केला. निरोप देण्यासाठी वाल्हे पंचक्रोशीतील ग्रामस्थ वाल्हे येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या तळावर आले होते.
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील शेवटच्या मुक्कामानंतर शनिवारी सकाळी पालखी सोहळ्याने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. यावेळी, माउलींच्या अश्वाने सकाळी साडेसहा वाजता पालखीचे दर्शन घेतल्यानंतर, लाखो वैष्णवांच्या उपस्थितीत ग्रामस्थांनी पालखी खांद्यावर घेतली. यावेळी “ज्ञानोबा माऊली, तुकाराम”, ज्ञानराज माऊली तुकाराम” नामाचा अखंड जयघोष आणि टाळ-मृदंगाच्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता. याप्रसंगी, वाल्हेकर ग्रामस्थांनी पालखीला खांदा देऊन भावपूर्ण निरोप दिला.
यावेळी, पुरंदर प्रशासनातील, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, गटविकास अधिकारी डॉ. अमिता पवार, जेजुरी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे, वाल्हे सरपंच अतुल गायकवाड, वाल्हे पोलिस दुरक्षेञातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक केशव जगताप, दिपक काशिद, प्रशांत पवार, मंडल अधिकारी भारत भिसे, तलाठी सतीश उमाप, ग्रामविकास अधिकारी राजाराम शेंडगे, कोतवाल आनंद पवार, हनुमंत पवार, सचिन देशपांडे आदींसह पुरंदर तालुक्यातील अनेक प्रशासकीय अधिकारीवर्ग उपस्थित होते.
शुक्रवार व शनिवारी दिवभर, वाल्हे, सुकलवाडी, पिसुर्टी ग्रामपंचायत, व सामाजिक कार्यकर्त्यांनी, ठिकठिकाणी वारकऱ्यांच्या स्नानासाठी पाण्याची सुविधा उपलब्ध केल्याने वारकऱ्यांची योग्य सोय झाली होती. पालखी प्रस्थानप्रसंगी पालखीतळावर विविध दिंड्या अखंड माऊलींचा जयघोष होत होता. वाल्हे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनीहि विठूनामाचा जयघोष करत पालखीला भावपुर्ण निरोपही दिला.
दरम्यान, पोलिसांच्या वतीने पालखी मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जशी जशी पालखी पुढे मार्गस्थ होत होती, तसे मागील रस्ते वाहतुकीसाठी खुले केले जात होते. वारी निघण्याअगोदर यावर्षी पाऊस पडला नसल्याने, शेतीची कामे लांबल्याने शेतकरीवर्ग दरवर्षी पेक्षा यावर्षी मोठ्याप्रमाणात, वारकऱ्यांची संख्या अधिक जाणवत होती.





