Pune District : माजी आमदार मोहितेंकडून पोटनिवडणुकीचा संभ्रम

राजगुरुनगर : खेड विधानसभेची पोटनिवडणूक होणार हा माजी आमदारांनी संभ्रम निर्माण केला आहे. माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. मुळात उच्च न्यायालयाने तुमचे अपील स्वीकारले नाही. कलम ७ (११ ) खाली ते फेटाळले आहे. त्यामुळे तालुक्यात पोटनिवडणूक होऊच शकत नाही. असे स्पष्टीकरण खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी पत्रकार परिषदेत दिले. यावेळी आमदार काळे यांनी मोहिते यांच्यावर सडकून टीका केली.
माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी पत्रकार परिषद घेत खेड मतदारसंघात पोटनिवडणूक होणार, असे वक्तव्य केले होते. यावेळी पत्रकार परिषदेत माजी आमदार मोहिते यांनी आमदार काळे यांच्यावर अनेक आरोप केले होते. त्याबाबत आमदार काळे यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले. यावेळी शिवसेनेच्या जिल्हा महिला संघटक विजया शिंदे, उपजिल्हा प्रमुख शिवाजी वर्पे, तालुका प्रमुख रामदास धनवटे, ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब ताये, युवा सेनेचे मृण्मय काळे, शहर प्रमुख संतोष ऊर्फ पप्पू राक्षे उपस्थित होते.
आमदार काळे म्हणाले, माजी आमदार मोहिते यांना पुन्हा आमदार होण्याची स्वप्न पडत आहेत. मात्र, हे त्यांचे स्वप्न केवळ स्वप्न राहणार आहे. त्यामुळे खोटी माहिती जनतेला देऊ नका, माझ्या संपत्तीवर चौकशी लावण्यापेक्षा तुमची संपत्ती किती? असा सवाल करीत मीच तुमच्यावर ‘ईडी’ची चौकशी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तुम्ही केलेले घोटाळे, खून यांची उच्च स्तरीय चौकशी लावणार आहे. पुनर्वसनच्या जमिनी लाटल्याची चौकशी लावणार आहे. तुम्हाला जनतेने नाकारले आहे आता शांत बसा नाहीतर पुढे अडचणीचे होईल, कोठे बसावे लागेल हे आता पुढची वेळ ठरवेल, तालुक्यातील जनतेच्या मागे बाबाजी काळे ठामपणे उभा राहील. मुख्यमंत्री, मंत्री यांच्या कार्यक्रमात मी दिसू लागल्याने माजी आमदारांची चलबिचल होत आहे. माझ्याकड़े माझ्या मुलाकडे ते खुनशीने पाहतात. मात्र, मला धार्मिकतेची आणि जनतेची ताकद आहे. त्यापुढे तुमचे काहीच चालणार नाही.
काळे म्हणाले, माजी आमदार मोहिते यांनी केलेल्या कामाचे मी श्रेय घेतले नाही, घेणार नाही. मी नवीन विकासकामे मंजूर करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. तालुक्यातील २५ शाळा स्मार्ट शाळा करायच्या आहेत. स्मार्ट शाळा करण्यासाठी तालुक्यातील ३५ शाळांना २५ कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. तालुक्यात चाकण, राजगुरुनगर आणि आळंदी या तीन नगरपरिषदा आहे मात्र त्यातील पाणी, कचरा, रस्ते आणि आरोग्याचे प्रश्न अद्यापपर्यंत का सुटले नाहीत. १५ वर्षे तुम्ही आमदार होते. हे प्रश्न सोडवण्यात तुम्ही अपयशी झाले आहेत. खेड तालुका भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी माझे प्रयत्न आहेत.
खेड तालुक्यात विमानतळ आणणार
आमदार काळे म्हणाले की, खेड तालुक्यात विमानतळ होण्यासाठी माझा प्रयत्न सुरु आहे. त्याबाबत मंत्री अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा सुरु आहे. जर मुंबईला तीन चार विमानतळ होतात तर खेड तालुक्यात पुन्हा विमानतळ होऊ शकते. त्यासाठी पाठपुरावा करीत आहे. तालुक्यात मोठी एमआयडीसी आहे. रिंग रोड झाले आहेत. रेल्वे प्रकल्प होणार होता मात्र त्याचा मार्ग बदलला. तरीही त्याबाबत प्रयत्न सुरु आहेत.
चाकणची एमआयडीसी जगात स्मार्ट एमआयडीसी करणार
ते म्हणाले की, खेड तालुक्यात जगात नाव असलेली एमआयडीसी ही तालुक्याची “शान” आहे. जगातील उद्योजकांचे उद्योग धंदे चाकण एमआयडीसीमध्ये आहेत. त्यांना सेवा, सुविधा आणि सुरक्षा देण्यासाठी आणि एमआयडीसी भयमुक्त करण्यासाठी माझे प्रयत्न आहेत. त्यातील गुंडगिरी संपविणार आहे. जगातील स्मार्ट एमआयडीसी करण्याचा प्रयत्न आहे. तालुक्यातील युवकांना रोजगार मिळण्यासाठी माझे कायम प्रयत्न सुरू आहेत.





