Pune District : हद्दीच्या वादात वनविभागाने हात झटकले

टेकवडीत कचरा डेपो ; शहरातील कचरा गावात
वाघापूर – पुरंदर तालुक्यातील टेकवडी गावातील वनविभाग हद्दीत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या जागेत कचऱ्याचे मोठे ढीग दिसत आहेत. टेकवडी गावाची हद्द दौंड वनपरीक्षेत्राची येत आहे. पुरंदरची नाही. आम्ही दौंड विभागाला कळविणार आहोत, वनपरिक्षेत्र अधिकारी सागर ढोले यांनी सांगितले आहे.
आता पुरंदर आणि दौंडचा हद्दीचे कारण सांगून वनविभागाकडून हात झटकले जात असल्याचा आरोप गावकऱ्यांतून होत आहे.
कचरा ढिगामध्ये दुर्गंधीयुक्त पदार्थ, कोंबड्यांचे मांस तसेच काचा व फरशीचे तुकडे असून हा कचरा नेमका कोण टाकत आहे, हा प्रश्न सध्या ग्रामस्थांना पडलेला आहे. ऑक्सिजन व्हिलेज टेकवडी अशी ओळख गावचे माजी उपसरपंच तथा सदस्य सूरज गदादे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी करण्याचा प्रयत्न असताना गावात दुर्गंधीयुक्त कचरा टाकून लोकांच्या जिवीताशी खेळण्याचा नेमका कोण प्रयत्न करत आहे, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
एक बाजूला वन विभाग त्यांच्या जागेत काही जणांनी अतिक्रमण केले आहे. त्यावर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारतात. पण आता त्यांच्या जागेत चक्क कचरा डेपो तयार होत आहे, हे त्यांना माहित कसे नाही, अशी शंका उपस्थित होत आहे. वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. माजी उपसरपंच सूरज गदादे यांनी वनविभागालाच कचरा डेपोबाबत पत्र पाठवले आहे.
घाटमाथ्यावर टाकलेला कचरा हा शहरी भागातूनच आलेला आहे. प्रशासनाने (दि.17) रोजी रात्रीचे त्या मार्गावरील सर्व सीसीटिव्ही फुटेज तपासून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
एका बाजूला आम्ही वृक्षारोपणातून ऑक्सिजन व्हिलेज टेकवडी अशी ओळख करीत आहे. तर दुसरीकडे शासनाची जागा कचरा डेपो होत आहे. याकडे शासनानं लक्ष दिले पाहिजे. शासनाने कार्यवाही नाही केली तर वनविभागाच्या अधिकाऱ्यांची आणि ठेकेदारांची चौकशी करावी.





