पुणे जिल्हा : स्वातंत्र्यानंतर प्रथमच धावली फोफसंडी एसटी बस

आदिवासी दुर्गम भागातील प्रवाशांची होणार सोय
नारायणगाव – भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अमृत महोत्सवी वर्षात परिवहन महामंडळ नारायणगाव (जुन्नर) आगाराची ओतुर-फोफसंडी एसटी. बस शुक्रवारी (दि. १) प्रथमच धावली असून, आदिवासी दुर्गम भागातील प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
ही बस ओतूर बस स्थानकावरून संध्याकाळी साडेसहा वाजता फोफसंडीसाठी सुटणार असून, रात्री आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी मुक्कामासाठी पोहोचेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता फोफसंडी येथून ओतूरसाठी रवाना होईल, अशी माहिती नारायणगाव डेपोचे आगार प्रमुख वसंत अरगडे यांनी दिली. एसटी बस सुरू झाल्याने दत्तू उंबरे, ऋषिकेश वळे, अंकुश घोडे, तुकाराम पिचड, सुनील मुठे, नयना उंबरे, विठाबाई भगत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली आदिवासी बांधवांची मागणी पूर्ण होत असून, ओतुर, कोपरे मार्गे अकोले तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील फोफसंडी येथे एसटी बस सेवा सुरू करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला असल्याचा फोफसंडी पळसुंदे गावचे लोकनियुक्त सरपंच सुरेश वळे यांनी दिली.
एसटी बस सेवा झाल्याने पर्यटन विकाससाठी चालना मिळणार आहे. ग्रामपंचायतच्या वतीने महामंडळला निवेदने देण्यात आली होती. ग्रामपंचायत सदस्य उमेश माळी, उपसरपंच संजय घोडे सातत्याने पाठपुरावा करत होते.
आदिवासी भागात निसर्गाने मुक्त सौंदर्याची उधळण केलेली असून कुंजीरगड, कोंबड किल्ला, मांडवी नदीचे उगम स्थान, कळसुबाई शिखर, हरिश्चंद्रगड अभयारण्या सारखा सौंदर्य लाभलेला दुर्गम भाग व तेथील संस्कृती व वारसा जपत जीवन जगत असलेला आदिवासी दळणवळणाच्या सुविधा अभावी विकासापासून वंचितच राहिलेला आहे.





