आळंदी : संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याला अवघा महिना बाकी असताना आळंदीतील पदपथांवरील अतिक्रमणाची समस्या गंभीर बनली आहे. मुख्य रस्त्यांवरील पदपथांवर खाद्यपदार्थांच्या गाड्या, कपड्यांचे स्टॉल, फळविक्रेते, पंक्चर दुकाने यांसारख्या टपर्यांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे पादचार्यांना, विशेषतः वृद्ध आणि भाविकांना, मुख्य रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई होत असली, तरी ती तात्पुरती ठरत असून पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त करीत पदपथ पादचार्यांसाठी की विक्रेत्यांसाठी, असा सवाल उपस्थित केला आहे. प्रदक्षिण रोडसह वडगाव रोडवरील पदपथांवर अतिक्रमणाचा प्रश्न अधिकच बिकट आहे. खाद्यपदार्थांच्या गाड्या, फळविक्रेते आणि पंक्चर दुकानांनी पदपथ व्यापला आहे. यामुळे पादचार्यांना रस्त्यावरून चालावे लागत असून, अपघाताचा धोका वाढला आहे. मरकळ रोड येथील टाकी शेजारील पदपथावरही विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. नदी पलीकडील दर्शनबारी व्यवस्थेजवळील पदपथावर लाकडी बांबू आणि इतर साहित्याने अडथळे निर्माण झाले आहेत. यामुळे भाविक आणि स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. चौकट उपाय काय? पदपथवरील विक्रेत्यांसाठी नियोजित जागा आणि परवाने देणे प्रशासनाने सातत्यपूर्ण अतिक्रमणविरोधी कारवाई करावी पदपथावरील विक्रेत्यांसाठी नियोजित जागा आणि परवाने द्यावेत विक्रेत्यांनी स्वयंशिस्त पाळून पदपथ मोकळा ठेवावा महाराष्ट्र शासनाने तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत आळंदीतील सर्व रस्ते, व पदपथ विकसित केले आहेत मात्र विविध प्रकारच्या व्यवसायकांनी हे पदपथ गिळंकृत केले आहेत, त्यामुळे स्थानिकांसह भाविकांना रस्ता ओलांडणे देखील जिकरीचे झाले आहे. पालखी सोहळा अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपला आहे, तरी वारी पूर्वीच आळंदीमध्ये असणार्या सर्व पदपथांवरील अतिक्रमणे काढून घेतली जाणार आहे. – माधव खांडेकर, मुख्याधिकारी, आळंदी नगरपरिषद