Pune District: जनतेच्या समस्या तात्काळ सोडवण्यावर भर द्या

मंचर : आंबेगाव तालुक्यात महसूल, भूमी अभिलेख, पंचायत समिती विभाग, कृषी विभाग, महावितरण इत्यादी विभागातील विविध समस्या तुमच्या विभागात आल्या तर त्या समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करा, अशा सूचना माजी सहकार मंत्री, आमदार दिलीप वळसे पाटील यांनी शुक्रवार, दि. ११ रोजी अधिकाऱ्यांना दिल्या.
घोडेगाव (ता.आंबेगाव) येथे पंचायत समितीच्या हुतात्मा बाबू गेनू सभाग्रहात आयोजित जनता दरबार कार्यक्रमप्रसंगी माजी सहकार मंत्री, आमदार दिलीप वळसे पाटील बोलत होते. जनता दरबार कार्यक्रमप्रसंगी शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शाह,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, समाज कल्याण विभागाचे माजी सभापती सुभाषराव मोरमारे, पंचायत समितीचे माजी सभापती संजय गवारी, अजय आवटे, रामदास घोलप, प्रकाश घोलप, उद्धवराव लंके, मंचर विभागाचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार संजय नागटिळक , गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज, महावितरणचे कार्यकारी अभियंता शांताराम बांगर यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी दिलीप वळसे पाटील म्हणाले की, आंबेगाव तालुक्यात घोडनदी पात्रात रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत आहे.
याबाबत यापूर्वीही तहसील, प्रांताधिकारी यांना कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. मात्र वाळू उपसा सुरूच आहे. त्यामुळे आता अवैध्य वाळू उपसा करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी. तालुक्यात विविध शेतकऱ्यांच्या पाणंद रस्त्याच्या अडीअडचणी आहेत. त्या अडीअडचणी सामंजस्याने सोडवण्याचा प्रयत्न करावा. दर रविवारी मी मंचर येथील पूजन जनसंपर्क कार्यालयात बसत असतो.
त्यावेळी तालुक्यातील अनेक नागरिक त्यांच्या विविध अडीअडचणी घेऊन माझ्याकडे येतात. त्यांनी दिलेली निवेदने आम्ही संबंधित विभागाला पाठवत असतो. मात्र, त्या निवेदनाचे पुढे काय होते ते त्या शेतकऱ्यांना, नागरिकांना कळत नाही. यापुढील काळात संबंधित विभागाने पाठवलेले अर्जावर पंधरा दिवसाच्या आत कार्यवाही करावी व त्यावर काय कार्यवाही केली त्याचे लेखी उत्तर माझ्या कार्यालयात कळवावे. अशा सूचनाही वळसे पाटील यांनी दिल्या.
दर शुक्रवारी जनता दरबार
यावेळी आंबेगाव तालुक्यातील नागरिकांनी असलेल्या विविध समस्या, कामे अधिकाऱ्यांकडून होत नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात केल्या. वळसे पाटलांनी याबाबत योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देवून दर शुक्रवारी घोडेगाव येथे जनता दरबार घेवून नागरिकांच्या कामाचा निपटारा करण्यासाठी प्रयत्न केला जाईल.





