पुणे जिल्हा : रिंगरोडच्या पैशांच्या वादातून गोळीबार

* कोरेगाव मूळ येथे उद्योजकाचा प्रताप ; दोघे जखमी
* रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू
सोरतापवाडी – कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथील इमानदार वस्ती येथे रिंगरोड जमिनीच्या व्यवहारातील पैशांच्या वादातून एका उद्योजकाकडून दोन जणांवर गोळीबार केला. उरुळी कांचन पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. जखमींची नावे समजू शकली नाहीत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीस संशयीत आरोपीचा शोध घेत आहेत.
लोणी काळभोर येथील एका खासगी रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहेत. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.
घटनास्थळावरून आणि पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोरेगाव मूळ येथील इमानदार वस्ती येथे एका बड्या उद्योजकाच्या घरात रिंगरोडच्या जमिनीमध्ये गुंतवणूक केलेले पैसे मागण्यासाठी दोन तरुण शेतकरी गेले होते. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. या वादात उद्योजकाने आपल्या पिस्तुलातून दोन राऊंड फायर केले. यावेळी पायावर व पाठीवर गोळी लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. जखमींना लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
रात्री उशिरापर्यंत पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, पोलीस उप अधीक्षक बापूसाहेब दडस, उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलीस अधीक्षक देशमुख यांनी तपासासंदर्भात उरुळी कांचनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांना सूचना केल्या.
उच्चभ्रूंची कोट्यवधींची रक्कम अडकली
गोळीबार केलेला उद्योजक हा रियल इस्टेटमध्ये कार्यरत आहे. त्याने रिंग रोडमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. पैशाची गुंतवणूक करुन मोठा परतावा मिळावा म्हणून अनेकांकडून कोट्यवधी रुपये घेतल्याची चर्चा आहे. त्याने गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा परतावा दिल्याने त्याच्याकडे कोट्यवधींची गुंतवणूक झाली आहे. या परतावा देण्यामुळे त्याचे ग्रहमान फिरले असून त्याच्याकडे गुंतवणूक केलेले कोट्यवधी रुपये अडकून पडल्याची शक्यता व्यक्त होत आहे. हवेलीतील बडे उद्योजक, अधिकारी, राजकारणी यांची मोठी रक्कम त्याच्याकडे असल्याची चर्चा आहे.





