Pune District: पेठ गावच्या किसान कनेक्ट मॉलला आग

मंचर : आंबेगाव तालुक्यातील पेठ येथे असलेल्या किसान कनेक्ट मॉलला आग लागल्याची घटना गुरुवार, दि. १७ रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास घडली असून या आगीत मॉलमधील भाजीपाला, फळे, ड्रायफ्रूट्स यासह विविध साहित्य जळून खाक झाले आहेत. घटनास्थळी आग विझवण्यासाठी राजगुरुनगर नगरपंचायतीचा अग्निशामक दलाची गाडी दाखल झाली असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पुणे नाशिक हमरास्त्याच्या पेठ गावाच्या हद्दीत दहा हजार स्क्वेअर फूट असलेल्या या मॉलमध्ये आंबेगाव तालुक्यासह इतर तालुक्यातील शेतकऱ्यांचा शेती माल गोळा करून त्यावर प्रक्रिया करून तो पॅकिंग करून ऑनलाइन पद्धतीने शहरात विक्री केला जातो.
मॉलवर पत्रा असून उन्हाळ्याच्या दिवसात भाजीपाला गरम होऊ नये, मॉलमधील वातावरण थंड रहावे, यासाठी पाचट टाकण्यात आले आहे. या पाचटालाच कशाची तरी आग लागून आगीने रौद्ररूप धारण केले व संपूर्ण मॉलला आग लागली असल्याची प्रार्थमिक माहिती समोर आली आहे. आग लागली त्यावेळी मॉलमध्ये शंभर कामगार काम करत होते. ते सर्व सुखरूप आहेत.





