Pune District : पिंपळी लिमटेकमध्ये दहा महिला बचत गटांना अर्थसहाय्य

बारामती – पिंपळी लिमटेक येथील ग्रामपंचायत सभागृहामध्ये समुदाय संसाधन निधी वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत, जिल्हा परिषदेमार्फत, बारामती तालुका कक्ष पंचायत समितीतर्फे उदय प्रभाग संघ व एकता महिला ग्रामसंघ पिंपळीमार्फत पिंपळी लिमटेक येथील दहा बचत गटांना प्रत्येकी साठ हजारांप्रमाणे एकूण सहा लाख रुपयांच्या समुदाय संसाधन निधीचे सीआयएफ धनादेशांचे वाटप करण्यात आले.
यावेळी प्रभाग समन्वयक शुभांगी सूर्यवंशी, सरपंच स्वाती ढवाण, माजी उपसरपंच व समुदाय संसाधन अश्विनी बनसोडे, ग्रामसंघाच्या अध्यक्षा सानिया इनामदार आदींच्या हस्ते वाटप करण्यात आले. याप्रसंगी प्रभाग समन्वयक शुभांगी सूर्यवंशी यांनी समूदाय संसाधन निधीचा उपयोग वैयक्तिक अथवा सामूहिक व्यवसाय स्थापन करण्यासाठी करावा अन्य ठिकाणी खर्च करू नये. स्वतःचा व्यवसाय स्थापन करून स्वतःचा आर्थिक विकास साधावा व कर्जाची नियमित परतफेड करावी. खेळते भांडवल आरएफ, ऑडिट रजिस्टर पूर्ण करणे, आरोग्य विषयक माहिती, बँक कर्ज प्रकरण, महिलांसाठी विविध ट्रेनिंग मार्केटींग आदींविषयी माहिती त्यांनी दिली.
माजी उपसरपंच अश्विनी बनसोडे यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या व्यवसाय उद्योगासाठी उपलब्ध असलेल्या कर्ज योजना आणि शासनाच्या विविध उद्योग, व्यवसाय योजनांबद्दल माहिती दिली. समुदाय संसाधन निधीचा चांगला वापर करून आपली प्रगती साधावी. उर्वरित गटांनी देखील समुदाय संसाधन निधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी ग्रामसंघाच्या पदाधिकारी व सर्व बचतगटाच्या अध्यक्षा सचिव अश्विनी बनसोडे, सानिया इनामदार, अश्विनी भोसले, स्वाती माने, माधुरी धोत्रे, भारती यादव, शितल निंबाळकर, राणी यादव, मुमताज इनामदार, छाया शिंदे, शीला वाघ, अरुणा वाघ, स्वाती ठेंगल, कविता यादव, उषादेवी ठेंगल, माधुरी यादव, रेशमा रुपनवर, मनीषा मारकड, उषा घोरपडे, पूनम थोरात, शुभांगी माने, मानीनी थोरात, बेबी खोमणे आदी बचतगटातील प्रमुख महिला उपस्थित होत्या.





