पुणे जिल्हा : हिरडा नुकसान भरपाई मिळण्यासाठी पुन्हा लढा सुरू

– भर पावसात शेकडो शेतकऱ्यांनी घेतली निर्धार प्रतिज्ञा
मंचर – आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यात भर पावसात आदिवासी भागातील शेतकऱ्यांनी हिरड्यांचे झालेले नुकसान भरपाई मिळण्यासाठी आणि शासनाचे लक्ष्य वेधण्यासाठी शेकडो हिरडा उत्पादक महिला-पुरुष यांनी गावाच्या पातळीवर निर्धार करत प्रतिज्ञा घेत सरकारच्या विरोधात संताप व्यक्त केला. हिरडा नुकसान भरपाई न मिळाल्यास ऐन श्रावण महिन्यात तीव्र आंदोलनास सुरुवात होईल, असा निर्धार या प्रतिज्ञेच्या माध्यमातून शुक्रवार दि. ५ रोजी करण्यात आला आहे.
मागील चार वर्षे किसान सभा व हिरडा उत्पादक शेतकरी लोकशाही व संविधानिक मार्गाने सरकारच्या विरोधात नुकसान भरपाई मिळवण्यासाठी लढत आहे. ही नुकसान भरपाई मिळावी म्हणून आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील सुमारे ४० पेक्षा अधिक गावात शेकडो हिरडा उत्पादक शेतकरी महिला- पुरुषांनी निर्धार प्रतिज्ञा घेवून हिरडा नुकसान भरपाई मिळेपर्यंत संविधानिक मार्गाने लढण्याचा निर्धार केला आहे. या पुढील काळात किसान सभेच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाणार आहे.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तमाम हिरडा उत्पादक शेतकरी बांधवाना व्यक्तिगत वा सामूहिक निर्धार प्रतिज्ञा घेऊन दि. १२ मार्च २०२४ रोजी शासनाने काढलेल्या शासननिर्णयाचे जाहीर वाचन करावे. असे आवाहन किसान सभेच्या वतीने करण्यात आले होते.या आवाहनाला प्रतिसाद देत आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील शेकडो हिरडा उत्पादक महिला-पुरुष यांनी गावाच्या पातळीवर निर्धार प्रतिज्ञा घेतली. जांभोरी,पोखरी,चिखली, फलोदे, कोंढवळ,
तेरुंगन,म्हातार बाचीवाडी,गोहे खुर्द, पाटण,पिंपरी,कोंढवळ,कुशिरे बुद्रुक, कुशिरे, भोईरवाडी,आघाने आदी गावात लोकांनी उस्फूर्तपणे निर्धार प्रतिज्ञा घेतली. किसान सभेच्या निर्धार प्रतिज्ञा गावोगावी लोकांनी घेण्यासाठी किसानसभेचे डॉ. अमोल वाघमारे, राजू घोडे,विश्वनाथ निगळे,अशोक पेकारी,कृष्णा वडेकर,लक्ष्मण जोशी,अशोक जोशी,रामदास लोहकरे,दत्ता गिरंगे,कोंडीभाऊ बांबळे,संदीप शेळके, बाळू कोंढवळे, कावजी तिटकारे,अशोक पारधी, चिंतामण लांघी, नारायण वायाळ यांनी आवाहन केले होते.त्याला हिरडा उत्पादक शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.





