Pune District : शेतकऱ्याचा मुलगा जिद्दीने बनला सनदी लेखापाल

-पिंपळगाव येथील प्रणव पोखरकर याच्यावर कौतुकाचा वर्षाव
मंचर – कोणतेही स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती व जिद्दीला आपल्या प्रामाणिक कष्टाची जोड दिल्यास आकाशाला ही गवसणी घालता येते. हे पिंपळगाव खडकी (ता.आंबेगाव) येथील शेतकरी कुटुंबातील प्रणव सूर्यकांत पोखरकर यांनी दाखवून दिले आहे. त्याने सनदी लेखापाल परीक्षा उत्तीर्ण होण्याची किमया केली आहे.
प्रगतिशील शेतकरी सूर्यकांत दामू पोखरकर यांचा प्रणव याने दहावीपर्यंतचे शिक्षण राजगुरुनगर या ठिकाणी झाले. तसेच अकरावी-बारावीचे शिक्षण बीएमसीसी कॉलेज पुणे या ठिकाणी झाले.एम कॉमचे शिक्षण गरवारे कॉलेज पुणे या ठिकाणी झाले. मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील प्रणव हा २२ व्या वर्षी सीए झाला आहे.
पहिल्यापासून अभ्यासात हुशार असणाऱ्या प्रणवची सीए होण्याची मनोमन इच्छा होती. ती त्याने त्याच्या कष्टाच्या आणि मेहनतीच्या जोरावर सार्थ ठरविले आहे. गावातील ग्रामस्थांनी प्रणव पोखरकर याची मिरवणूक काढून स्वागत केले.
मला हे यश मिळवण्यासाठी माझ्या कुटुंबीयांकडून नेहमीच सकारात्मक पाठिंबा मिळाला. तसेच सर्व शिक्षक आणि मित्र परिवाराकडून योग्य असे मार्गदर्शन मिळाले.एवढी अवघड परीक्षा मी उत्तीर्ण झालो.
-प्रणव पोखरकर, पिंपळगाव खडकी.





