पुणे जिल्हा : तीन लाखांपर्यंतचे शेतकर्यांचे कर्ज माफ करणार; शरद पवार यांची ग्वाही

मंचर : राज्यात महागाईने डोंगर उभा केलाय. सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. त्याचे सत्ताधार्यांना काही घेणे देणे नाही. राज्यात शेतकर्यांच्या आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत. शेतकर्यांबाबत या सरकारला कळवळा नाही. त्यासाठीच आता महाविकास आघाडी सत्तेवर आल्यावर तीन लाख रुपयापर्यंत कर्ज शेतकर्यांचे माफ केले जाईल. अशी ग्वाही शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी (दि. 13) यांनी दिली.
आंबेगाव विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्त निकम यांच्या प्रचारार्थ मंचर येथे झालेल्या सभेत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उमेदवार देवदत्त निकम, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, शिवसेनेचे सुरेश भोर, राजाराम बाणखेले, काँग्रेसचे राजू इनामदार, उद्योजक गुलाबराव धुमाळ, किसनशेठ उंडे, विजय रसाळ, धोंडीभाऊ भोर, गणेश यादव, बाळासाहेब बाणखेले, स्वातीताई मुळे, दत्ता गांजाळे, सदानंद शेवाळे आदी उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, राज्य सरकारने बहिणींना दीड हजार रुपये दिले; परंतु त्यांची सुरक्षा मात्र करण्यात सरकारला यश आले नाही. सुमारे चौदाशे मुली बेपत्ता आहे. यामुळे सरकारवरचा भरोसा कमी झाला असून बहिणीच्या ताकदीमुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्याशिवाय राहणार नाही.
उमेदवार देवदत्त निकम म्हणाले, तालुक्यात सत्तेचा आणि संस्थाचा गैरवापर चालू आहे. डिंभे धरण बोगदा रद्द केल्याबाबतचा शासन निर्णय उमेदवार वळसे पाटील यांनी दाखवावा. अन्यथा जनतेची माफी मागावी. असे थेट आव्हान त्यांनी दिले.
बोगद्याबाबत मौन
उमेदवार देवदत्त निकम यांच्या भाषणात प्रत्येक मुद्द्याच्या नंतर डिंभे धरण बोगदा असा उल्लेख करून तसेच सभेतील मतदारांनी बोगदा -बोगदा असे म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवारांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला; परंतु ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपल्या भाषणात या बाबत अवाक्षर काढले नाही. त्यामुळे मतदारामध्ये संभ्रम झाल्याचे दिसून आले.





