Pune District : शेतकऱ्यांचा तरकारी पिकाकडे कल

सोमेश्वरनगर : ऐन उन्हाळ्यात तुडुंब भरून वाहणाऱ्या नीरा डाव्या कालव्यामुळे
बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात उसाचे क्षेत्र मोकळे झाल्यानंतर अनेक शेतकरी पारंपारिक शेतीला बगल देऊन आधुनिक शेतीकडे वळलेली पाहायला मिळत आहेत.
निंबूत, खंडोबाचीवाडी, गरदडवाडी, वानेवाडी, मुरूम परिसरात मोठ्या प्रमाणात शेतीच्या मशागती करून साडेचार फुटी सरी काढून शेणखत, सेंद्रिय खत त्याचबरोबर रासायनिक खताचा वापर करून बेडवर ड्रिप इरिगेशन करून मल्चिंग पेपरचा वापर करीत आहेत. टोमॅटो तसेच इतर तरकारी पिके यांची लागवड सुरू झाली आहे. काही शेतकऱ्यांची तरकारी पिके फुलोऱ्यात आलेली दिसत आहेत. अनेक युवा शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने टोमॅटो, कारले, काकडी या पिकांची लागवड केली आहे.
सर्वत्रच टोमॅटो लागवडीचा हंगाम चालू असल्याने मोठ्या प्रमाणात मजुरांचा तुटवडा भासताना दिसत आहे. सध्या टोमॅटो पालेभाज्यांचे दर कमी असल्याने भाजीपाला शेती शेतकऱ्यांना परवडत नाहर, अशी स्थिती झाली आहे. शेणखत, रासायनिक खताचे मोठ्या प्रमाणात वाढलेली बाजारभाव तसेच मजुरांची वाढलेले दर तसेच पिकांना नसलेला हमीभाव त्यामुळे तरकारी शेती करणे अवघड असल्याचे मत निंबूतचे माजी उपसरपंच उदय काकडे यांनी व्यक्त केले.





