Pune District : महावितरणकडून नवीन फ्यूज पेट्या बसविण्यात आल्याने शेतकरी समाधानी

सामाजिक कार्यकर्ते निलेश यशवंत वाळुंज यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
शिरूर – अन्नापुर (ता. शिरूर) येथे दीर्घकाळ प्रलंबित असलेला व शेतकऱ्यांच्या सुरक्षेशी संबंधित गंभीर प्रश्न अखेर सुटला आहे. निलेश यशवंत वाळुंज यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर महावितरण प्रशासनाने दखल घेतली व गावातील रोहित्रांवरील जीर्ण झालेल्या फ्यूज पेट्या बदलून नवीन पेट्या बसवल्या आहेत.
केंगार मळा – १, माळीवस्ती – २, कॉलोनी – १ अशा एकूण चार ठिकाणी रोहित्रांवर नवीन पेट्या बसविण्यात आल्या आहेत. वाळुंज यांनी दिलेल्या माहितीनुसार, अधीक्षक अभियंता बारामती दीपक लहामगे यांच्याकडेही याबाबत पाठपुरावा करण्यात आला होता. त्यानंतर शिरूरचे उपकार्यकारी अभियंता सुमित जाधव, शरद माने व सहाय्यक अभियंता वैभव बारवकर यांनी संयुक्त प्रयत्नातून ही कामे पूर्ण केली गेली.
“शेतकरी बांधवांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या धोकादायक फ्यूज पेट्यांच्या बदलामुळे आता रोहित्र सुरक्षित स्थितीत राहणार असून शेतकऱ्यांच्या जीविताचे संकट टळले आहे. या कामामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे व सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे. तालुक्यात जिथे कुठे धोकादायक फ्यूज पेट्या असतील, त्या महावितरणाकडून स्वप्रेरणेने बदलण्यात याव्यात.” – निलेश वाळुंज





