पुणे जिल्हा : नागापूरच्या शेतकऱ्याने शेतीतून घेतले काकडीचे पीक

– दहा किलोला मिळतोय दीडशे रुपयांप्रमाणे बाजारभाव
मंचर: आंबेगाव तालुक्यातील नागापूर येथील शेतकरी विजय केरभाऊ चासकर या शेतकऱ्याने आपल्या एक एकर शेतीमध्ये काकडीचे पीक घेतले असून सद्यस्थितीला त्यांना ५५ हजार रुपये खर्च आला. सध्या दहा किलोला दीडशे रुपये याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे. त्यांना चाळीस हजार रुपये नफा झाला आहे. काकडी पिकावर रोगराई न आल्यास आणि बाजारभावाचे हमीभाव मिळाल्यास त्यांना निव्वळ नफा एक लाख रुपयांच्या आसपास मिळण्याचा अंदाज शेतकरी विजय केरभाऊ चासकर यांनी व्यक्त केला आहे.
काकडी पिकाची लागवड त्यांनी जुलै महिन्यात केली असून दीड ते दोन महिन्यात काकडी चालू होण्यास सुरुवात झाली. त्यासाठी त्यांनी नाझिया या काकडी जातीची ५ हजार नगांची लागवड केली. त्यासाठी एक रुपया काडी याप्रमाणे पाच हजार रुपये खर्च आला. शेत तयार करण्यासाठी चार ट्रॉली शेणखत वीस हजार रुपये, कोंबडी खत एक ट्रॉली ५ हजार रुपये, औषधे दहा हजार रुपये अशा प्रकारे एकंदरीत रासायनिक खते दहा हजार रुपये, मजुरी ५ हजार रुपये एकंदरीत ५५ हजार रुपये खर्च आला आहे.
सध्या काकडीला दहा किलोला दीडशे रुपये याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे. एका तोड्यास ५०० किलो माल तयार होतो. त्यानुसार ७ हजार ५०० रुपये तोड्यास मिळतात. खर्च वजा जाता त्यांना आतापर्यंत चाळीस हजार रुपये नफा झाला आहे. बदलत्या हवामानामुळे शेतातील वाढलेल्या खर्चामुळे हे शेतकरी आर्थिक मेटाकुटीला आला आहे. खतांच्या वाढलेल्या किमती तसेच मजुरी या समस्येने शेतकरी त्रस्त आहे. असे शेतकरी विजय केरभाऊ चासकर यांनी सांगितले.
सणासुदीमुळे चांगला भाव
काकडी हे पीक उष्ण आणि कोरड्या हवामानात वाढणारे पीक आहे. पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन या पिकास योग्य ठरते. तसे पोषक हवामान नागापूर येथे असल्यामुळे हे पीक जोरदार आले. हे उन्हाळी पीक जरी असले तरी आॅगस्ट व सप्टेंबरच्या दरम्यान सणासुदीमुळे काकडीला चांगला भाव मिळतो. त्यामुळे हे उत्पादन या महिन्यांमध्येही घेतले तरी चालते.
काकडीचे फळ हे कोवळे असतानाच त्याची तोडणी करावी म्हणजे चांगला भाव मिळतो. जाती व हंगामानुसार प्रति एकरी १०० ते १२० क्विंटलपर्यंत उत्पादन घेता येऊ शकते.





