Pune District : मेट्रोचा विस्तार यवतपर्यंत करा

आमदार कुलांची विधानसभेत मागणी : मंत्र्यांचे सकारात्मक उत्तर
दौंड/ पारगाव – पुणे शहर व उपनगरांतील दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहतूक कोंडी ही नागरिकांसाठी गंभीर समस्या बनली आहे. या प्रश्नाची दखल घेत मेट्रोचा विस्तार यवतपर्यंत करा, अशी लक्षवेधी सूचना आमदार ॲड. राहुल कुल यांनी महाराष्ट्र विधानसभेत मांडून सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. चर्चेदरम्यान त्यांनी यावर सखोल भाष्य करत अनेक महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले.
या मागणीवर मंत्री दादा भुसे यांनी पुणे रिंगरोड प्रकल्प, हडपसर-यवत आणि पुणे-शिरूर उन्नत मार्ग व पुणे ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड महामार्गाचे काम वेळेत पूर्ण केले जातील. प्रकल्पांच्या प्रगतीसाठी राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली जाईल. प्रकल्पातील विविध अडचणी व सुधारणा यासाठी मासिक आढावा बैठक नियमितपणे घेण्यात येईल. असे आश्वासन दिले.
ॲड. कुल म्हणाले की, पुणे परिसरातील वाहतूक समस्या ही दोन स्तरांवर विभागली जाऊ शकते. एक म्हणजे शहराच्या आतली वाहतूक, दुसरी म्हणजे शहराच्या बाहेरील उपनगरातील आणि बाह्य भागातील वाहतूक. विशेषतः हडपसर ते यवत आणि पुणे ते शिरूर (नगर) मार्गावरील वाहतूक हा खूप मोठा प्रश्न आहे. त्या मार्गांवर उन्नत मार्ग (फ्लायओव्हर) रस्ते बांधण्याची कामे मंजूर केली आहे. त्याच्या निविदा देखील झालेल्या आहेत. हि कामे दिलेल्या मुदतीत पूर्ण करावीत अशी मागणी त्यांनी केली. पुणे ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड महामार्गाचे काम देखील वेळेत पूर्ण करावे, अशी मागणी त्यांनी केली. त्यासाठी राज्य सरकारने चार वर्षांचा कालावधी अपेक्षित असल्याचे उत्तर दिले आहे. पुणे ते यवत दरम्यान उन्नत मार्गावर लोणीकाळभोर पर्यंत प्रस्तावित असलेली मेट्रो यवतपर्यंत करावी, अशी मागणी देखील कुल यांनी यावेळी केली आहे.
आमदार कुल म्हणाले की, वाहतूक कोंडीसारख्या स्थानिक प्रश्नांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी दरमहा विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त आणि संबंधित लोकप्रतिनिधी यांच्यात बैठक घेण्याची गरज आहे. त्रुटी दूर करण्यासाठी विशेषज्ञांची नेमणूक करण्याची गरज आहे. सर्वसामान्य नागरिक या समस्येने त्रस्त असून, आम्हा लोकप्रतिनिधींना यावर वारंवार प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हे केवळ प्रशासकीय नाही, तर सामाजिक दायित्वाचेही काम आहे. स्मार्ट सिटी योजनेचा उद्देश चांगला असूनही त्याची अंमलबजावणी सुसंगत नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
सभागृहात आक्रमक पवित्रा
चर्चेदरम्यान पीठासीन अधिकारी यांनी ‘प्रश्न विचारा’ असे सूचित केल्यावर ॲड. राहुल कुल हे अधिक आक्रमक होत म्हणाले, मी इतरांसारखा फक्त भाषणबाजी करत नाही, तर सकाळी ९:३० वाजता सभागृहात येतो. जनतेचे खरे प्रश्न मांडतो. हाच माझा लोकप्रतिनिधी म्हणून खरा पवित्रा आहे.” त्यांच्या ठाम भूमिकेने सभागृहाचे लक्ष वेधले.





