पुणे जिल्हा : कार्यकारी सोसायटी करणार व्यवसायास मदत : सुधीर रेणुसे

वेल्ह्यात गावपातळीवर लवकरच बैठका
वेल्हे – विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून गाव-खेड्यांतील शेतकऱ्यांना आणि तरुण-तरुणींना व्यवसाय-धंद्यासाठी आर्थिक मदत करण्यात येणार असून, यासाठी लवकरच गाव पातळीवर बैठका घेऊन विविध योजनांची माहिती देणार असल्याचे लव्ही (ता. वेल्हे) विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे अध्यक्ष सुधीर रेणुसे यांनी सांगितले.
शहरांमध्ये गेलेली कुटुंबे जरी छोट्या-मोठ्या व्यवसायांमध्ये किंवा नोकऱ्यांमध्ये प्रगती करत असली तरी गाव-खेड्यांतील लोकांना मदत होणे गरजेचे आहे. त्यांचा आर्थिक स्तर उंचावणे ही महत्त्वाचे असून या लोकांना शासनाच्या विविध योजनांबरोबरच व्यवसाय-धंद्यांसाठी जिल्हा बॅंकेमार्फत विविध सोसायट्यांच्या माध्यमातून आर्थिक पुरवठा होत असताना त्याची माहिती देणे आणि तो मिळवून देणे ही आमची जबाबदारी आहे.
पुण्यासारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुधाचा तुटवडा असून ही गरज भागवण्याच्या दृष्टीने गाव खेड्यातील तरुणांनी दुग्ध व्यवसायात आले पाहिजे यासाठी सर्व स्तरांतून प्रयत्न होत असताना सोसायटीच्या माध्यमातून म्हैस, गाय आणि अन्य शेतीपूरक व्यवसायांसाठी आर्थिक मदत करण्यात येत असून या योजनांचा सर्वांनी फायदा घेतला पाहिजे अशी विनंती सुधीर रेणूसे यांनी केली आहे.
आर्थिक मदतीच्या वापराचे सर्वेक्षण गरजेचे
विविध कार्यकारी सोसायट्यांमार्फत शेतकऱ्यांना वेगवेगळ्या कारणासाठी कर्ज पुरवठा केला जातो; परंतु शेतकरी ही आर्थिक मदत प्रत्यक्ष कोणत्या गोष्टीसाठी वापरतात, याचेही सर्वेक्षण होणे गरजेच आहे. अनेकवेळा कारण एक असते आणि पैशाचा वापर वेगळा केला जातो. नियोजनबद्ध व्यावसाय केल्यास सोसायटीमार्फत केलेल्या आर्थिक मदतीचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
सोसायटीमार्फत होणारा कर्जपुरवठा आणि प्रत्यक्ष जमिनीची किंमत यात तफावत आहे. जिल्हा बॅंक व सोसायटी यांनी गुंठा, एकर, किंवा हेक्टरमार्फत होत असलेला कर्जपुरवठा तुटपुंजा आहे. प्रत्यक्ष याचेही सर्वेक्षण झाले पाहिजे आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत झाली पाहिजे.
– इंदुताई दरडिगे, ग्रामपंचायत सदस्य, गुंजवणे
संयुक्तपणे दुग्ध व्यवसाय करण्याच्या दृष्टीने काही प्रयत्न होतात का किंवा विविध गावांतील तरुण एकत्र आल्यास दुग्ध व्यवसाय कशा पद्धतीने प्रगती करता येईल किंवा कोणत्या संस्थांमार्फत आर्थिक मदत होईल या दृष्टीनेही प्रयत्न होणार आहेत. सोसायटीचे अध्यक्ष यांचे या संदर्भात मार्गदर्शन घेणार आहोत.
– संजय लिम्हण, माजी सरपंच, गुंजवणे.





