Pune District : इलेक्ट्रिक बाईकचा ताप; चार दिवसांचा मुक्काम

राहू : सध्या इंधन दरवाढ, प्रदूषणावर मात करण्यासाठी इलेक्ट्रिक बाईकची जागतिक बाजारपेठेत चलती आहे. गावागावांत इलेक्ट्रिक बाईक दिसू लागल्या आहेत. मात्र, या इलेक्ट्रिक बाईकने जावाईच्या घरी आल्यानंतर चार्जिंगअभावी चार दिवस मुक्काम करावा लागला. ही घटना दौंड तालुक्यातील एका गावात घडली.
हजारो वर्षांपासून आदी मानव काळापासून मानवाने प्रगती करीत अनेक नवनवीन शोध लावला. दळणवळणात अनेक मोठे क्रांतीकारक बदल झाले. अश्मयुगीन काळापासून ते २१ व्या शतकांपर्यंत दळणवळणासाठी घोडा गाडीपासून मोटार गाडीपर्यंत शोध लागले. डिझेल व पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांनी क्रांती केली. परंतु डिझेल व पेट्रोल हे इंधन हे मर्यादित असल्यामुळे ते कधीतरी संपणार आहे. यावर मात करण्यासाठी विजेवर चालणारी चारचाकी व दुचाकी तयार केली आहे. या विजेवर चालणाऱ्या दुचाकीचाच किस्सा राहू बेटातील एका गावात घडला.
सध्या पाऊस चालू असल्यामुळे काहीअशी शेती कामांना विसावा आहे. यातूनच शिरूर तालुक्यातील एका गावातील सासरेबुवा आपली ई- बाईक घेऊन दौंड तालुक्यातील राहू बेटातील एका गावातील मुलीला व जावयाला भेटायला आले. एक दिवस राहून दुसऱ्या दिवशी सासरे बुवा व त्यांचा एक मित्र हे नियोजन करून आपल्या घरी निघणार होते. शनिवारी सकाळी आलेले सासरे बुवा हे जेवण करून एक दिवस मुक्काम करून रविवारी दुपारी निघणार होते.
परंतु त्यांची दुचाकी चार्ज नव्हती. त्यातच चार्ज होण्यासाठी मोठा कालावधी लागतो. रविवारी सायंकाळी पाऊस होऊन विजेचे चार खांब पडल्यामुळे रविवारी रात्रभर व सोमवारी दुपारपर्यंत वीज गूल होती. त्यांची दुचाकी चार्जिंगच करता आली नाही. सोमवारी संध्याकाळपर्यंत देखील त्यांची दुचाकी चार्ज होऊ शकली नाही. सोमवारी सायंकाळी आठनंतर चार्जिंग लावून मंगळवारी सकाळी दुचाकी पूर्ण चार्ज झाली. सासरे बुवा एकदाचे दोन तीन दिवसांचा पाहुणचार घेऊन आपल्या घरी मार्गस्थ झाले.




