पुणे जिल्हा : निवडणूक शेतकऱ्यांच्या विकासासाठी की धुळवडीसाठी

मंचर बाजार समितीत शेतकरीहिताचा जाहीरनामा नाही
संतोष वळसे पाटील
मंचर : मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही विकासाच्या मुद्द्याऐवजी राजकीय मुद्द्यांवरच पार पडली.निवडणुकीत विविध पक्षांनी शेतकऱ्यांच्या शेतीमाल विकासाबाबत कुठलाही जाहीरनामा न काढता निवडणूक प्रचारात फक्त राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले, त्यामुळे खऱ्या अर्थाने ही निवडणूक बाजार समितीच्या शेतकऱ्यांच्या विकासासाठी की राजकीय धुळवडीसाठी होती, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आला आहे.
मंचर बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक काही दिवसांपूर्वीच पार पडली असून, येत्या काही दिवसांत बाजार समितीचे सभापती व उपसभापतीची निवडणूक होणार आहे. यात राष्ट्रवादी, कॉंग्रेस, शिवसेना ठाकरे गट अशा स्वरूपाची महाविकास आघाडी होती. शिवसेना-भाजपचे स्वतंत्र पॅनल उभे राहिले होते, तर देवदत्त निकम यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे बंडखोरांचेही एक पॅनल उभे राहिले होते. अशा स्थितीत 18 जागेपैकी तीन जागा बिनविरोध झाल्या होत्या, तर 15 जागांसाठी निवडणूक पार पडली.
प्रचारात महत्त्वाची भूमिका ही जाहीरनाम्याच्या माध्यमातून भूमिका लोकांपुढे सभासद शेतकऱ्यांकडे मांडण्याचा प्रयत्न केला जातो. येणाऱ्या कालखंडामध्ये बाजार समितीत कोणती विकासकामे केली जातील, बाजार समितीबाबत येथून पुढील कालखंडात काय भूमिका राहणार याबाबत कोणीही अवाक्षर काढले नाही. शेतकऱ्यांसाठी काय सुविधा देणार, शेतकऱ्यांच्या मालाच्या बाबतीत काय भूमिका राहणार, बंद भाजीपाला बाजार यावरही कुणीच बोलले नाही, त्यामुळे निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यांऐवजी राजकीय मुद्द्यांवरच पार पडल्याचे दिसून येते.
चांडोलीच्या जागेत विकास नाही
मंचर बाजार समितीने मंचर नजीक असलेल्या चांडोली येथे 15 एकर जागा घेतली आहे. जागा घेऊन 12 वर्षे झाली; परंतु विकासाच्या दृष्टीने कार्यवाही झाली नाही. तळेघर, घोडेगाव, लोणी इत्यादी बाजार समितीच्या उपबाजारात विकासाच्या दृष्टीने ठोस उपाय योजना झालेल्या नाही, त्यामुळे शेतकऱ्यामध्ये नाराजी आहे.
पुढील कालखंडातील नियोजन काज?
एकंदरीत मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आंबेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य व सोसायटीचे संचालक मतदान करत असले तरी मंचर बाजार समितीमध्ये जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड तालुक्यातील भाजीपाला तरकारी मार्केटमध्ये येत असतो. कांदा मार्केटमध्येही आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्यातून कांदा विक्रीसाठी येत असतो. मंचर बाजार समिती ही चांगल्या प्रकारे काम करत आहे, त्यामुळे येथे येणारा शेतकऱ्यांचा ओघ जास्त आहे; परंतु येथून पुढील कालखंडात बाजार समिती शेतकऱ्याच्या विकासासाठी काय करणार याबाबत प्रचारात दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.





