Pune District : माळेगावसाठी केंद्राच्या मदतीसाठी प्रयत्न

खासदार सुप्रिया सुळे यांची ग्वाही
बारामती – विरोधात असताना देखील कामे होतात. माळेगाव कारखान्यासाठी केंद्रातून मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. जास्तीचा दर, कारखान्यातील पैशांची उधळपट्टी, तसेच नीरा नदी प्रदूषण या विषयावर सुळे यांनी लक्ष वेधले.
पणदरे येथे बळीराजा सहकार बचाव पॅनलच्या माध्यमातून माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी शरद पवार गट सामोरे जात आहे. त्या पार्श्वभूमीवर सुळे बोलत होत्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, निवडणुकीसाठी चर्चेतून मार्ग निघेल, असे वाटत होते, पण तसे झाले नाही. नीरा नदी प्रदुषणाच्या मुद्द्याकडे त्यांनी लक्ष वेधले. बारामतीकर आणि माझे प्रेमाचे नाते आहे. त्या नात्यासाठी ही निवडणूक लढवत असल्याचे सांगून नीरा नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी काम आपण करणार असल्याचे सांगितले. यावेळी सत्ता आल्यानंतर सर्वसमावेशक आणि पारदर्शक पद्धतीने भरती केली जाईल, असा शब्द त्यांनी दिला.
यावेळी संचालक मंडळाला पूर्ण स्वायत्त दिले जाईल असे सांगितले. यावेळी ९० हजाराच्या भेळचा उल्लेख करत वैयक्तिक खर्चासाठी कारखान्याचा निधी वापरला जाणार नाही, असा मुश्किल टोमणा त्यांनी यावेळी मारला. कारखाना पारदर्शक पद्धतीने चालला पाहिजे आणि शेतकऱ्यांना पैसे जास्त मिळाले पाहिजेत, याकडे लक्ष देणार असल्याचे सांगितले





