पुणे जिल्हा : नीरा-भाटघरच्या पाण्यावर पूर्वेकडील बागायत फुलते

तरीही दुष्काळ जाहीर : भोर-वेल्ह्यावर अन्याय
भोर – भोर तालुक्यातील भाटघर, निरादेवघर आणि वेल्हे तालुक्यातील चापेटगुंजवणी या धरणांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा आहे. पुरंदर तालुक्यातील वीर धरणात आज मितिस 44.57 टीएमसी एवढा पाणी साठा उपलब्ध असून, बारामती, इंदापूर, पुरंदर येथे याच पाण्यावर बागायती शेती फुलत आहे. मात्र, तेथे शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसांत भोर-वेल्हे तालुक्यांत पिण्याचे पाणीही कमी पडत असून, तेथे दुष्काळ जाहीर होत नाही, हा अन्याय असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून, भोर-वेल्हे तालुक्यातही दुष्काळ जाहीर करावा अशी मागाणी होत आहे.
राज्य शासनाने जिल्ह्यातील नीरा नदी धरण साखळीच्या पाण्यावर अवलंबून असलेले बारामती, पुरंदर, इंदापूर तालुक्यांचा दुष्काळी तालुक्यात समावेश केला आहे. नीरा-देवघर व भाटघर धरणांमधील पाणी उन्हाळ्यात सोडल्यानंतर भोर तालुक्यातील गावांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. यावर्षी पूर्वेकडील तालुक्यांना दुष्काळाचा निधी मिळणार असल्यामुळे त्यांना फक्त पिण्यासाठीचेच पाणी सोडावे, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.
नीरा-देवघर, भाटघर व वीर या धरणांमधील पाण्यामुळे पुरंदर बारामती व इंदापूर तालुक्यातील 37 हजार 70 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते, तर खंडाळा, माळशिरस, पंढरपूर व सांगोला या तालुक्यांतील 65 हजार 506 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. यावर्षी भोर-वेल्ह्यात वेळी-अवेळी झालेल्या पावसामुळे भात पिकाबरोबारच कडधान्य पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असूनत पीक पळंजावर गेल्याने उत्पादनात घट येणार असल्याने भोर-वेल्हे तालुक्यातही शासनाने दुष्काळी तालुक्यांत समावेश करावा अशी मागाणी जोर धरत आहे.
गतवर्षीपेक्षा आठ टक्के पाणीसाठा कमी
निरा नदी धरण साखळीतील नीरा-देवघर, भाटघर, गुंजवणी व वीर या चार धरणांमध्ये गतवर्षीपेक्षा आठ टक्के पाणीसाठा कमी आहे. चारही धरणांमधील 49.19 टीएमसी पाणीसाठ्यापैकी 44.57 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी एक नोव्हेंबरला चारही धरणात 100 टक्के पाणीसाठा होता. वीर धरणात सर्वात कमी 61.73 टक्के पाणीसाठा असून, त्याखालोखाल वेल्हे तालुक्यातील गुंजवणी धरणात 97.59 टक्के पाणीसाठा आहे. भोर तालुक्यातील भाटघर धरणात 99.71 टक्के, तर नीरा- देवघर धरणात 100 टक्के पाणीसाठा आहे. भाटघर आणि निरादेवघर धरणांवरील वीजनिर्मिती केंद्रही बंद आहेत.





