सासवड : देशामध्ये स्वच्छतेचा डंका पिटणाऱ्या नगरपरिषदेमध्ये अनेक प्रकारचे निधी उपलब्ध असतात. याच निधीच्या माध्यमातून सासवड नगरपरिषदेने अनेक चौकांमध्ये पुतळे उभे केले आहेत. या पुतळ्यांवर धुळीचे साम्राज्य असल्याचे पाहावयास मिळत आहेत. नगरपरिषद प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. देश पातळीवर स्वच्छतेच्या बाबतीत अनेक वेळा नगरपरिषदेला पुरस्कार प्राप्त झाले आहेत. पुरस्काराच्या रकमेतून अनेक विविध विकासकामे केली जातात. त्याच धर्तीवर सासवड नगरपरिषदेने अनेक चौकांमधून पुतळे बसवले आहेत. परंतु या पुतळ्यांवर धूळ साचलेली आहे. ती धूळ काढण्यासाठी कदाचित नगर परिषदेकडे निधी उपलब्ध नसावा, अशी मार्मिक चर्चा सुरू झाली आहे. सासवड नगर परिषद हद्दीतील लवकरच पुतळे स्वच्छ केले जातील. त्याचबरोबर नगरपरिषदेसमोरील सर्व होर्डिंग काढून घेण्यासाठी सूचना केलेले आहेत. – डॉ. कैलास चव्हाण, मुख्याधिकारी, सासवड. नगरपरिषदेकडे साधनसामुग्री असून देखील पुतळ्यांवरील धूळ निघत नसल्याने नागरिकांनी मात्र संताप व्यक्त केला आहे. पुतळ्यांच्याभोवती अनेक दुकाने थाटली जात असून पुतळ्यांच्या भोवती अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. नगर परिषदेच्या समोर देखील मोठ- मोठे होर्डिंग उभे केली असल्याने नगरपरिषद होर्डिंगच्या आडोशाला असल्याची चर्चा नागरिकांच्यात आहे.