पुणे जिल्हा : प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे खाद्यपदार्थ विक्रेते सुसाट

भोर शहरात कारवाईची मागणी वाढली
हातगाडीवरील पदार्थांची गुणवत्ता धोक्यात
अन्न-औषध प्रशासनाचे कार्यालय पुण्यात
नगरपालिका परिसरात परवान्याशिवाय व्यवसाय
भोर – भोर शहरात व तालुक्यात गेल्या काही वर्षांत हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या व्यवसायाचा कोणताही शासकीय परवाना नसताना ढाबे, हॉटेल राजरोसपणे चालवली जात आहेत. अशा हॉटेल व्यावसायिकांवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई होत नाही. अन्न व औषध प्रशासनाचे कार्यालय पुण्यात आहे. त्यामुळे भोर नगरपालिका हद्दीतील आणि महामार्गावरील हॉटेल आस्थापना, अन्नपदार्थ विक्रेते आणि अन्न भेसळ करणाऱ्यांकडे दुर्लक्ष होऊ लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
ढाबे, छोटी हॉटेल, पाणीपुरीवाले, हातगाडीवर अन्नपदार्थ विक्री करणाऱ्यांची संख्या भोर परिसरात मोठी आहे. पुणे-सातारा महामार्गावर आणि आजूबाजूच्या गावात, शहरात आणि ग्रामीण भागात भेसळखोरीचे प्रमाण वाढले आहे. मात्र, यावर अंकुश ठेवण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे या भागात दुर्लक्ष होत असल्याने भेसळयुक्त पदार्थांची राजरोसपणे विक्री होऊ लागली आहे.
भोर शहरात पाणीपुरी विक्रीच्या दुकानावर गर्दी होते. मात्र, तेथील आपुऱ्या जागेत कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही, यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. अन्न-औषध प्रशासनाने तालुकास्तरावर कार्यालय सुरू करावे, अशी मागणी होत असून, यामुळे काही प्रमाणात तरी पदार्थ विक्रेत्यांवर अंकुश बसू शकेल.
हातगाडीवरील पदार्थांची गुणवत्ता धोक्यात
हॉटेल, ढाबे, चहा, वडापावच्या गाड्यांवर हातगाडीवर खाद्यपदार्थ विकले जातात. ते पदार्थ खाण्यायोग्य आहेत की नाही यासाठी त्या पदार्थांची गुणवत्ता तपासण्यासाठी अन्न औषध प्रशासनाची कोणतीही यंत्रणा कार्यरत नाही. त्यामुळे तळलेले तेल पुनः पुन्हा वापरणे, पदार्थ बनविण्यासाठी वापरली जाणारी ग्रेव्ही आठ आठ दिवस फ्रीजमध्ये ठेवून वापरणे. भाज्या बनविण्यासाठी व पिण्यासाठीचे पाणी अशुद्ध असल्याचे नागरिक सांगतात. याबाबत तक्रार कोणाकडे करायची, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.





