जेजुरी – जेजुरी नगरपालिका बांधकाम विभागाच्या निष्क्रिय कारभाराचा आणखी एक उदाहरण पुढे आले आहे. गेली दोन महिन्यांपासून मुख्य महाद्वार रस्त्यावरील भुयारी गटाराचे चेंबर फुटलेले आहे. दरम्यान, सर्वच ठिकाणी चेंबरची हीच अवस्था असून येथील प्रशासन व्यवस्थेत घोषणा आश्वासनांचा सुकाळ अंमलबजावणीचा दुष्काळ असल्याचे दिसून येते.
मुख्य महाद्वार रस्ता हा देवदर्शनासाठी गडावर येण्याजाण्याचा मार्ग असल्याने पायी जाणार्या येणार्या भाविकांची संख्या लक्षणीय असते. गर्दीच्या वेळी एखाद्या भाविकाला या चेंबरमुळे मोठा अपघात होण्याचा धोका असूनही याबाबीकडे दुर्लक्ष केले जाते.
शहरामध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून रस्ते गटारांची कामे केली जातात; मात्र ती कुचकामी ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याबाबत नगरपालिकेला कळविण्यात आले आहे मात्र अजूनही त्या ठिकाणी नवीन चेंबर टाकण्यात आलेले नाही.