पुणे जिल्हा : राहू बेटात ड्रोनचा रात्रीस खेळ चाले ; नागरिक भयभीत, रात्र रात्र जागरण

राहू : दौंड तालुक्यातील वरवंड व पाटस गावच्या हद्दीमध्ये रात्रीच्या वेळेस अवकाशात ड्रोन फिरण्याच्या घटनेनंतर आता राहू बेट परिसरमध्ये देखील ड्रोनच्या घिरट्यांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. परिसरात वाढणारे चोऱ्यांचे प्रमाण, ड्रोनच्या घिरट्यांनी नागरिक रात्र रात्र भर जागरण करीत आहेत.याबाबत सतर्क राहून ड्रोन दिसल्यास पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्याकडून करण्यात आले आहे.
हे ड्रोन कुठून येतात आणि कुठे गायब होतात, हे समजत नसल्याने परिसरात घबराट पसरली आहे. पोलिसांना याबाबत नागरिकांनी सूचना दिल्यावर पोलीस गावा गावात गस्त घालत आहेत. परंतु ड्रोनचा शोध लागत नसल्याने हे रात्री उडणारे ड्रोन नागरिकांची आणि पोलिसांची डोकेदुखी बनली आहे. ड्रोन नेमका कोण व कशासाठी उडवत आहे, याच्या साहाय्याने हेरगिरी करून परिसरात चोऱ्या तर होत नाही, असे प्रश्न आता उपस्थित होत असून ड्रोनचा शोध घ्यावा, अशी मागणी आता देवकर वाडी, मगरवाडी, दहिटने, टेळेवाडी, वाळकी, कोरेगाव येथील नागरिक करीत आहेत.
संदर्भात दौंडच्या तहसीलदारांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, असा कोणत्याही सर्वेचे काम चालू नसून या संदर्भात पोलिसांना कार्यवाही करण्यास सांगितले आहे.
ड्राेनसंदर्भात माहिती घेतली आहे. त्यानुसार पेट्रोलिंग तसेच पोलीस पाटील व इतर संबंधितांना सतर्क केले आहे. या संदर्भात लोहगाव एटीसी येथे संपर्क केला असून तांत्रिक सहकार्य घेऊन लवकरात लवकर कार्यवाही केली जाईल.
-नारायण देशमुख, पोलीस निरीक्षक, यवत.
उच्च क्षमतेचा ड्रोन
हे ड्रोन उडत असताना इतर ड्रोनप्रमाणे यांचा आवाज हा अतिशय कमी प्रमाणत येत आहे. मध्यरात्रीच्या सुमारास हे ड्रोन उडत असल्याने खूप कमी नागरिकांना लक्षात येते. परंतु व्हॉट्स ॲप च्या माध्यमांमुळे नागरिक सतर्क होत आहेत. त्यामुळे ड्रोनचा जो उद्देश असेल तो सफल होताना दिसून येत नाही.





