पुणे जिल्हा : विभागाच्या हद्दीचा वाद, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

सा. बां. विभाग व पीएमआरडीएच्या वादातून नाल्यांचे काम रखडले
वाघोली – पुणे-नगर महामार्गावर गेली दोन महिन्यांपासून दुर्गंधीयुक्त पाणी वाहत आहे. सा. बां. विभाग व पीएमआरडीएच्या हद्दीच्या वादामुळे पावसाळी नाल्यांचे पूर्ण झाले नाही. पर्यायाने नगर रोडवरून दुर्गंधीयुक्त पाणी वाहत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा अतिशय गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
पीएमआरडीएकडून चार वर्षांपूर्वी वाघेश्वर चौक ते लाईफ लाईन हॉस्पिटलपर्यंत स्टॉर्म वॉटर लाइनचे काम करण्यात आले. लाइफलाइनपासून पुढे सा. बां. विभागाची हद्द सुरु होते. त्यामुळे सा. बां. विभागाने त्यानंतरचे काम बकोरी फाट्यापर्यंत केले; मात्र दोन्ही विभागाकडून काम पूर्ण न करता अर्धवट काम करण्यात आले. दोन्ही विभागाने हद्दीचा वाद पुढे करून पावसाळी नाल्यांचे काम अर्धवटच केले आहे.
पीएमआरडीएकडून चार वर्षांपूर्वी रस्ता रुंदीकरणासह पदपथ व पावसाळी नाल्यांचे काम करण्यात आले. पावसाळी नाल्या कचऱ्यांनी भरल्या असून पादचारी मार्गाची अवस्था सुद्धा दयनीय झाली आहे. ठेकेदाराचा पाच वर्षांचा कालावधी येत्या चार-पाच महिन्यात संपणार आहे. काम अर्धवट असताना तसेच चार वर्षांपासून मेंटेनन्स केलेले नसताना सुद्धा संबधित विभागाने ठेकेदाराला बिल कसे काढले असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
आमदारांनी लक्ष द्यावे
शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या कार्यालयासमोरील बाजूस सांडपाणी रस्त्यावर येऊन नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आले आहे. रस्त्याचे काम करणारे सार्वजनिक बांधकाम विभाग, अनधिकृत बांधकाम पाडणारे पीएमआरडीए नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न सोडवणार का असा सवाल आता नागरिकांकडून केला जात आहे. याबाबतीत शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी लक्ष घालून नागरिकांचा प्रश्न सोडवावा अशी मागणी केली जात आहे.
पीएमआरडीएकडून अकराशे मीटर स्टॉर्म वॉटर लाईन करण्यात आली होती. त्या लाईनला ग्रामपंचायतीने ड्रेनेजची लाईन जोडली असा अवहाल मिळाला आहे. चेंबर एका ठिकाणी खचला आहे, ती आमची जबाबदारी आहे ते दुरुस्त केले जाईल. ड्रेनेजचे पाणी सोडले असेल तर स्वच्छ करण्याची जबाबदारी मनपाची असेल.
-विजय कांडगावे, कार्यकारी अभियंता, पीएमआरडीए
केसनंद फाट्यावर असणाऱ्या पेट्रोल पंपाजवळ ड्रेनेजला जोडल्या गेले नसल्याने पाणी रस्त्यवर येत आहे. वाघेश्वर मंदिर ते लाईफ लाईन पर्यंत पीएमआरडीएच्या अखत्यारित असल्याने पीएमआरडीएने देखभाल करणे गरजेचे आहे.
– राहुल कदम, उप अभियंता, सा. बां. विभाग





