वीसगाव खोरे : भोर येथील पंचायत समितीच्या सभागृहामध्ये ज्येष्ठ पत्रकार , भोर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक,माजी अध्यक्ष स्वर्गीय भुजंगराव दाभाडे यांच्या निधनानिमित्त भोर तालुका पत्रकार संघाच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दाभाडे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. भुजंगराव दाभाडे यांनी निःपक्षपाती, निर्भिडपणे पत्रकारिता केल्याने त्यांचा आदरयुक्त दरारा समाज मनावर होता, असे मत जिल्हा नियोजन समिती सदस्य विक्रम खुटवड यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे यांनी दाभाडे यांचा वचक प्रशासनावर होता. तसेच आवश्यक ठिकाणी सल्ला देत, स्वभावाने ते प्रेमळ होते, असेही सांगितले. आपल्या लेखनातून दाभाडे यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने प्रयत्न केले. महिलांचा विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील असल्याचे माजी नगराध्यक्षा जयश्री शिंदे यांनी सांगितले. तसेच सामाजिक, राजकीय घडामोडींचे अचूक विश्लेषण करून समाजात सकारात्मकता वाढेल, अशी बातमी ते देत,असेही जयश्री शिंदे म्हणाल्या. तालुका कृषी अधिकारी शरद धर्माधिकारी यांनी दाभाडे यांना शेतीची आवड असल्याने शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान अवगत करण्यास ते नेहमी आग्रही असत, असे सांगितले. ज्येष्ठ पत्रकार डी. जे. सहस्त्रबुद्धे यांनी दाभाडे यांच्या निधानाने पत्रकारिता क्षेत्रातील एक तारा हरपला असून त्यांच्या जाण्याने पत्रकार संघात निर्माण झाली पोकळी भरून काढता येणं अशक्य आहे, असे सांगितले. या प्रसंगी उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, प्रमोद कुलकर्णी, गजानन शेटे,लहु मालुसरे, संजय भेलके, युवराज जेधे, केशव पवळे, बाळासाहेब साने, सुधीर दिघे, लक्ष्मीकांत कणसे, महेंद्र साळुंके,शोकाकुल नागरिक, भोर तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते. मागदर्शक हरपला ध्रुव प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजीव केळकर सर्व क्षेत्रातील मार्गदर्शक हरपला, तसेच त्यांनी नेहमीच प्रोत्साहन देण्याचे काम केले. माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे, अरुण डाळ, काॅम्रेड ज्ञानोबा घोणे, सुदाम ओंबळे, सुरेश शेटे, संतोष ढवळे, शिरीष चव्हाण, भिमराव शिंदे, पुरुषोत्तम मुसळे, राजेश महागंरे, विठ्ठल झांजले यांनी आदरांजली वाहताना पत्रकार क्षेत्रात केलेल्या कार्याचा जीवनपट उभा केला.