Pune District : दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा…श्रीक्षेत्र नारायणपूर दुमदुमले

गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
पुणे – दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नावाचा अखंड जयघोष… टाळ मृदंगाचा गजर…पादुका आणि मूर्तीवर होणारी पुष्पवृष्टी… मंदिरात केलेली विविधरंगी फुलांच्या माळांची आकर्षक सजावट… हा नयनरम्य सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी जमलेला लाखो भाविकांचा मेळा…वरुण राजाची हजेरी… अशा अतिशय प्रसन्न आणि भक्तिमय वातावरणात नारायणपूर (ता. पुरंदर) येथील एकमुखी दत्त मंदिरात व्यासपूजा आणि पाद्य पूजा करून गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.
श्रीक्षेत्र नारायणपूर येथील दत्त मंदिरात गुरुपौर्णिमे निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी राज्यभरातून आलेल्या हजारो भाविकांनी पहाटेपासून दर्शनाचा लाभ घेतला. पहाटे मंदिरात देवांना अभिषेक घालून महापूजा करण्यात आली. सकाळी 8 ते 9 यावेळात आरती घेण्यात आली. 9 ते 11 होम हवन होऊन दीप प्रज्वलन करण्यात आले. 11 वाजता व्यासपूजन करण्यात आले. तसेच पोपट महाराज आणि मंदिराचे व्यवस्थापक भरत क्षीरसागर यांच्या हस्ते 11. 30 वाजता सद्गुरू नारायण महाराज यांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करून मनोगत घेण्यात आले. त्यानंतर टाळ-मृदंगाच्या गजरात सामाजिक आरती घेण्यात आली.
यावेळी माजी आमदार उल्हास पवार, संजय जगताप, विश्व हिंदू परिषदेचे मंत्री दादा वेदक, नारायण धाम योग, निसर्गोपचार आणि आयुर्वेद संशोधन केंद्राचे डॉ. उमेशकुमार डोंगरे, नितीन भरगुडे पाटील, नारायणपूरचे सरपंच प्रदीप बोरकर, रामभाऊ बोरकर, चंद्रकांत बोरकर, बबनराव टकले, दादा भुजबळ, तात्यासाहेब भिंताडे, रामदास मेमाणे, दिगंबर भिंताडे, विशाल बोरकर, अजित बोरकर, पोपटराव सुके, ग्रामसेवक दादासाहेब भवर, अमोल जगताप यांच्यासह राज्याच्या विविध भागातील भाविक, मान्यवर उपस्थित होते.
मुख्य कार्यक्रम विधी पार पडल्यानंतर दुपारी उपस्थित सर्व भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. त्यानंतर विविधरंगी फुलांनी सजविलेल्या पालखीत मुखवटे आणि पादुका ठेवून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. रात्री महाआरती होवून मंदिर बंद करण्यात आले. यावेळी भजन संगीताचा कार्यक्रम अव्याहतपणे सुरु होता. मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा सोहळ्याची सांगता करण्यात आली.
नारायण महाराजांच्या निधनानंतर पहिलीची गुरुपौर्णिमा
क्षेत्र नारायणपूर येथील श्री दत्त मंदिराचे परमपूज्य नारायण महाराज यांचे मागील काही महिन्यापूर्वीच निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पहिलीच गुरुपौर्णिमा आहे. यापूर्वी स्वतः नारायण महाराज व्यासपूजा करीत होते; मात्र यंदा त्यांच्या पादुकांची पूजा करण्याची वेळ सर्व भाविकांवर आल्याचे दु:ख प्रत्येकाच्या चेहर्यावर प्रकर्षाने दिसून येत होते.





