Pune District : कोंडवाडे बांधण्याकरिता जागा निश्चिती, प्रस्ताव द्या

उपमुख्यमंत्री अजित पवार : बारामतीत विकासकामांची पाहणी
बारामती – शहरात भटकी जनावरे आणि कुत्रे याबबत नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने घेत नगरपरिषदेने बंदोबस्त करावा, त्यासाठी शहरातील विविध भागात कोंडवाड्याकरिता जागा निश्चित करून प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.
बारामतील श्री सिद्धेश्वर मंदिर परिसर, दशक्रिया घाट, शारदा प्रांगण येथील सुरूअसलेली विविध विकास कामे, माळावरची देवी ते जळोची चौक रस्ता, जळोची कॅनाल पुलावरून संभाजीनगरकडे जाणारा रस्ता, कॅनाल लगतची गार्डन जागा, जळोची ओढ्याशेजारील दशक्रिया घाट, दहन-दफनभूमी जागा, रुई हद्दीतील विद्या प्रतिष्ठान शेजारील दोन लहान पूल, गार्डन, स्मशानभूमी, पूर संरक्षण भिंतीच्या प्रस्तावित जागेची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून पाहणी केली.
प्रस्तावित जागेवर करण्यात येणाऱ्या कामांची पाहणी करुन पवार म्हणाले, बारामती परिसरातील हद्दवाढ लक्षात घेता प्रस्तावित जागेवर कामे सुरु करावीत. कामात अडथळा आणणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई करावी. या परिसरातील रुई-जळोची ओढा रुंदीकरणाची कामे करताना मोजणी करुन त्यामध्ये अतिक्रमण असल्यास ती काढावीत. या ओढ्याच्या दोन्ही बाजूस पूर संरक्षण भिंतीचे बांधकाम करावे.
शारदा प्रांगण परिसरात उभारण्यात येणाऱ्या सीबीएसई आणि मराठी शाळेत विद्यार्थी व शिक्षकांना लागणाऱ्या पायाभूत सुविधांचा विचार करुन इमारत व परिसर विकसित करा. पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांकरिता सुविधांचा करुन शौचालय, पाणी, विद्युत व्यवस्था आदींच्या अनुषंगाने कामे करावीत. कविवर्य मोरोपंत यांच्या स्मारकाची आवश्यक ती डागडुजी करुन घ्यावी.
यावेळी उपमुख्यमंत्री कार्यालयाचे उपसचिव विकास ढाकणे, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, महावितरणचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी किशोर माने, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे, आदर पुनावाला क्लीन सिटी इनिसिएटिवचे मुख्य कामकाज अधिकारी मल्हार करवंदे, श्री सिद्धेश्वर मंदिरचे विश्वस्त समीर दाते आदी उपस्थित होते.
ग्लूटन लिटर पिकिंग मशीन
आदर पूनावाला स्वच्छ शहर उपक्रमा अंतर्गत स्वच्छतेकरिता ४ ग्लूटन लीट्टर पिकिंग मशीन देण्यात आल्या आहेत, उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत नगरपरिषदेच्या सेवेत त्या दाखल करण्यात आल्या.





