सासवड – राज्यातील अंगणवाडी सेविका करोना काळामध्ये सर्वांत पुढे होऊन काम करत होत्या; परंतु त्यांना कामाच्या बदल्यामध्ये मोबदला मिळत नाही. तर त्यांना कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून घोषित केले पाहिजे. त्याचबरोबर गेल्या अनेक दिवसापासून संपावर असलेल्या अंगणवाडी कर्मचार्यांना प्रशासनाकडून नोटीसा बजावण्यात आले आहेत. या संदर्भात महिला बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांना भेटून या सर्व नोटिसा माघारी घेण्यात याव्यात, अशी मागणी करून बजेटच्या अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्न करणार असल्याचे आमदार संजय जगताप यांनी सांगितले. सासवड (ता. पुरंदर) येथील पंचायत समितीमध्ये पुरंदर तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी संप पुकारल्याने पुरंदर तालुका अंगणवाडी कृती समितीच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार संजय जगताप बोलत होते. यावेळी अंगणवाडी संघटनेच्या घन:श्याम निंबाळकर, सविता रायकर, अश्विनी गायकवाड, माया खेडेकर, मंगल रासकर, अनिता बेलसरे, हेमा अरणकल्ले, संगिता खोमणे, कविता बोरकर रेखा कांबळे, यांच्या नेतृत्वात येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय व पंचायत समितीच्या समोर आंदोलन करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी डॉ. अमिता पवार यांना निवेदन देण्यात आले. तर प्रकल्प अधिकार एस.आर. पाठक उपस्थित होत्या. यावेळी माजी मंत्री विजय शिवतरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विजय कोलते, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप पोमण, माजी जिल्हा परिषद सदस्य बबुसाहेब माहुरकर, राष्ट्रवादी काँग्रेस युवक (शरद पवार गट) अध्यक्ष पुष्कराज जाधव, युवा शिवसेनेचे (शिंदेगट) तालुकाध्यक्ष नितीन कुंजीर, सुनिता कोलते, अॅड. गौरी कुंजीर यांनी पाठिंबा दिला. “अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी संप पुकारल्याने अंगणवाडी केंद्रे कुलूप बंद असून आंगणवाडी स्तरावरील सर्व कामे ठप्प झाली आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे ग्रॅज्युटी मिळावी, वेतन श्रेणी मिळावी, भविष्य निर्वाह निधी व अन्य सामाजिक सुरक्षा योजना लागू कराव्यात.” – निलेश दातखिळे, उपाध्यक्ष, कृती समिती, महाराष्ट्र राज्य