आळंदी – कौटुंबिक हिंसाचाराच्या वाढत्या घटना आणि महिलांच्या सुरक्षेबाबत वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर दामिनी सखी जनजागृती कार्यक्रमाचा शुभारंभ आळंदी पोलीस स्टेशन या ठिकाणी झाला. हा कार्यक्रम पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, महिला व बाल विकास विभाग राज्य महिला आयोग, आळंदी देवस्थान, आळंदी नगरपरिषद, होप फॉर द चिल्ड्रन फाऊंडेशन आणि अलेमा कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने झाला. महिलांसाठी अधिक सुरक्षित वातावरण निर्माण करून त्यांच्या हक्कांबद्दल आणि उपलब्ध सुरक्षा उपायांबद्दल जागरूकता व्हावी यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. महिलांची सुरक्षितता केवळ काही संस्थांद्वारे सुनिश्चित केली जाऊ शकत नाही. त्यासाठी कायद्याची अंमलबजावणी, समुदाय नेते आणि समाजातील नेत्यांच्या एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे. खरा बदल घडवून आणण्यासाठी आपण सर्वांनी यामध्ये सहभागी होणे गरजेचे आहे. पोलीस आयुक्त गुन्हे शाखा 2 पिंपरी चिंचवड यांनी महिलांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आणि पोलीस आणि समाजातील सदस्य यांच्यातील सहकार्याच्या महत्त्वावर भर दिला. दामिनी सखी मोहिमेद्वारे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सर्वसमावेशक कायदेशीर मार्गदर्शन आणि समर्थन प्रदान करण्यासाठी कटिबद्ध आहे. या कार्यक्रमात महिलांच्या समस्या, हक्क आणि संबंधित कायदे या विषयावरील माहिती देण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्यायाधीश सोनल पाटील, आळंदी देवस्थाचे मुख्य विश्वस्त ऍड. राजेंद्र उमाप, होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन संस्थापक डॉ. केरोलीन, मुख्य कार्यक्रमाधिकारी शकील शेख, व्यवस्थापक, परम आनंद, शिवसेनेचे उत्तम गोगावले व पोलीस स्टेशनचे अधिकारी व होप फॉर द चिल्ड्रेन चे सर्व कर्मचारी तसेच संकेत विलास वाघमारे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषिकेश डिंबळे यांनी केले. हे उपक्रम राबविणार सुरक्षा पथक – दामिनी पथक : महिलांची सुरक्षा मजबूत करणे आणि छळ आणि हिंसाचार रोखणे. पोस्टर मोहीम: महिलांच्या सुरक्षिततेबद्दल जागरूकता वाढवणे. सीसीटीव्ही बसवणे: महिलांची सुरक्षा वाढवणे. स्व-संरक्षण प्रशिक्षण: समाजातील महिलांना स्वसंरक्षण कौशल्याने सुसज्ज करणे. समुपदेशन समर्थन: महिलांना निवारण आणि कल्याणासाठी संसाधनांमध्ये प्रवेश प्रदान करणे. हे उपक्रम राबविण्यात येणार आहे.