Pune District : गर्दीचा विक्रम करत ‘गारटकर मित्र परिवार’ची दहीहंडी

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव; गोविंदांचा पराक्रम अविस्मरणीय
इंदापूर – इंदापूर शहरात लोकनेते प्रदीपदादा गारटकर मित्र परिवाराच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा दहीहंडी उत्सव शनिवारी (दि. 23) प्रशासकीय भवनासमोरील शंभर फुटी रस्त्यावर हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत जल्लोषात साजरा झाला.
या भव्य सोहळ्याने गोविंदांच्या साहस, एकता आणि कौशल्याचा गौरवपूर्ण उत्सव सादर केला.
तिरंगा दहीहंडी, इंद्रेश्वर, वीर श्री मालोजीराजे, व्यंकटेश, महात्मा फुले, स्वराज्य (शिरसोडी) आदी नामांकित गोविंदा पथकांनी शानदार सहभाग नोंदवला. उत्सवाचे उद्घाटन राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व श्रीकृष्णमूर्ती पूजनाने झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, प्रसिद्ध अभिनेत्री सुरेखा कुर्ची यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, नृत्यांगना नमिता पाटील व त्यांच्या सहकार्यांच्या नृत्याविष्कारांनी तर रंगत आणखी वाढवली. आरजे अक्षय व संतोष नरुटे यांच्या खुमासदार समालोचनाने कार्यक्रमात चैतन्य फुलले.
गोपाळ कृष्ण की जय, बजरंगबली की जय, भारतमाता की जय अशा घोषणांनी इंदापूरचा आकाश दुमदुमून गेला. गोविंदांच्या पराक्रमाने व जनसमुदायाच्या उत्साहाने हा सोहळा अविस्मरणीय ठरला. या यशस्वी आयोजनासाठी माजी नगरसेवक अमर गाडे, स्वप्निल राऊत, अनिकेत वाघ, अतुल शेटे पाटील, दादा सोनवणे, आशू गानबोटे, सुधाकर ढगे, तशू शेख, राष्ट्रवादी शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, अमर लेंढवे, महेश जठार, रोहित ठोंबरे, युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, शुभम मखरे, रमेशआबा शिंदे, भरत देशमाने आदींचे मोलाचे योगदान लाभले.
गोविंदांचा पराक्रम आणि सन्मान
प्रत्येक सहभागी गोविंदा पथकाला 10 हजार रुपये रोख व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. व्यंकटेश दहीहंडी पथकाने तब्बल सात थरांची उभारणी करून सर्वांचे लक्ष वेधले. विशेष म्हणजे सर्वात वरच्या थरावर असलेली मुलगी हा कार्यक्रमाचा आकर्षणबिंदू ठरली. स्वराज्य दहीहंडी पथकानेही सात थरांची उभारणी करून दहीहंडीला बांधलेली फुले हस्तगत केली व 25 हजार रुपये रोख व चषकासह विजेतेपद पटकावले.





