Pune District : चिंतामणीच्या दर्शनाला भाविकांची गर्दी

थेऊर – आज आषाढ महिन्यातील संकष्टी चतुर्थी सोमवारी आल्याने भाविकांनी थेऊर येथील अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्री चिंतामणीच्या दर्शनाला पहाटे पासून गर्दी केली होती. पहाटे आगलावे बंधू यांच्या वतीने पुजारी मंगलमूर्ती आगलावे यांच्या हस्ते श्रींची महापूजा करण्यात आली. त्यानंतर सकाळी चिंचवड देवस्थानच्या वतीने श्री चिंतामणीची पूजा करण्यात आली यावेळी विश्वस्त केशव उमेश विद्वांस उपस्थित होते.
चिंचवड देवस्थान ट्रस्टचे वतीने मंदिर प्रांगण आणि मंदिराबाहेर मांडव घालण्यात आले होते, दर्शनबारी व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. चिंचवड देवस्थान ट्रस्ट आणि तर्पण ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. भाविकांनी मोठ्या प्रमाणात शिबिरात सहभाग घेऊन रक्तदान करण्याचे श्रेष्ठ कार्य केले.
दुपारी देवस्थान तर्फे भाविकांना उपवासाची खिचडी वाटण्यात आली. सायंकाळी चिंतामणी भजनी मंडळ यांचे साथीने हभप पांडुरंग महाराज काळे, आळंदी देवाची यांचे सुभाष्य कीर्तन झाले, चंद्रोदयानंतर श्रींचा छबिना काढण्यात आला त्यांनतर उपस्थित भाविकांना ग्रामस्थांतर्फे महाप्रसाद देण्यात आला. गर्दी होण्याची शक्यता असल्याने देवस्थान तर्फे जादा सुरक्षा व्यवस्था करण्यात केली होती. ग्रामपंचायती तर्फे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती.





