पुणे जिल्हा : पाण्याविना पिके करपली

इंदापूरच्या पश्चिम भागात विजेचा खेळखंडोबा : सहा तासांत अनेक वेळा “बत्तीगुल’
भवानीनगर/लासुर्णे : इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागात सुरू असलेल्या विजेच्या लंपडावामुळे शेतातील उभी पिके जळू लागले आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून विजेचा लपंडाव कधी थांबणार, असा संतप्त सवाल उपस्तित केला जात आहे. दिवसातून सकाळी सात ते दुपारी एक अशी फक्त सहा तास वीज शेतकऱ्यांना दिली जाते त्यातही तीन ते चारवेळा वीज खंडित होत असल्याने भर उन्हाळ्यात डोळ्यादेख पिके जळताना पाहण्याशिवाय काहीच करता येत नसल्याने बळीराजा चिंताक्रांत झाला आहे.
नीरा डावा कालव्याला आवर्तन सुटलेले असताना देखील शेतातील पिकांना पाणी मिळत नाही. वीज पंप चालू केले असता शेतात पाणी पोहोचेपर्यंत अनेक वेळा वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्यांना या सहा तासांमध्ये अर्धा एकर देखील पीक भिजवता येत नाही. त्याचप्रमाणे ज्या शेतामध्ये ठिबक सिंचन आहे त्या शेतामध्येही पाणी तेवढ्या प्रमाणात पोहोचत नाही. अनेक शेतकऱ्यांनी नीरा डाव्या कालव्याच्या बाजूला विहिरी खोदून पाच ते दहा किलोमीटर उचल पाणी नेले आहे.
हे उचल पाणी शेतामध्ये पोहोचण्यासाठी कमीत कमी अर्धा ते पाऊण तास लागतो; परंतु सध्याचा उन्हाळा कडक असून देखील हे उचल पाणी शेतामध्ये नेण्यासाठी वीज पंप सुरू केले असता शेतामध्ये पाणी पोहोचेपर्यंत अनेक वेळा वीज ये-जा करीत असल्याने सहा तासांपैकी फक्त दोन ते तीन तासच वीज शेतकऱ्यांना मिळत आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांना पाणी मिळत नसल्याने अनेक पिके करपू लागले आहेत.
द्राक्ष बागा छाटण्याचे थांबवले
सध्या ज्या भागांमध्ये द्राक्ष बाग आहेत त्या छाटणी अवस्थेत असून या बागा छाटल्या गेल्या तर पुन्हा त्या द्राक्षांना कोंब उगवण्यासाठी पाण्याची गरज असते; परंतु या विजेच्या लपंडावामुळे अनेक शेतकऱ्यांनी सध्या द्राक्ष बागा छाटण्याचे थांबवले आहे.
उचल पाण्याची, इरिगेशन नीरा डाव्या कालव्यातून मिळणाऱ्या आवर्तनाची, वीज आदी बिले भरून देखील शेतकऱ्यांना केवळ सहाच तास वीज शेतीसाठी मिळते. तीही अनेक वेळा खंडित होत असल्याने पिके पाण्याविना पूर्णपणे जाळाली तर या पिकांचे होणारे नुकसान व पुन्हा याच शेतामध्ये दुसरे पीक लावण्यासाठी शेतकऱ्यांचा होणारा खर्च शेतकरी कसा भरून काढणार व शेतकरी कशा पद्धतीने चांगल्या प्रकारे शेती करणार हाच प्रश्न निर्माण होत आहे.
– सोपानकाका पवार, शेतकरी, काझड-शिंदेवाडी
अनेक वेळा महावितरणच्या वेगवेगळ्या अडचणींमुळे वीज खंडित होत असल्याने शेतकरी शेतातील पिके जगवण्यासाठी अडचणीत येत आहे. याचा विचार करून वीज वितरण विभागाने शेतकऱ्यांना पूर्णपणे सहा तास वीज कशी मिळेल याची व्यवस्था करावी.
– तात्यासाहेब देवकाते, शेतकरी, कण्हेरी





