Pune District : राजगुरूनगरातील अतिक्रमणावर हातोडा

नगरपरिषदेकडून वाडा रस्त्यावर कारवाई
राजगुरूनगर – शहरातील वाडा रस्त्यावर अतिक्रमणविरोधी मोहीम राबविण्यात आली. राजगुरूनगर शहरातील वाडा रस्त्यावर मंगळवारी (दि. 17) नगरपरिषदेने अतिक्रमणविरोधी कारवाई राबवली. यात रस्त्यालगतच्या छोटे मोठे स्टॉल्स, हातगाड्या आणि फळ-भाजी विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली.
या रस्त्यावर शाळा, कॉलेज, पंचायत समिती, प्रांत कार्यालय यांसारखी महत्त्वाची ठिकाणे असल्याने वर्दळ जास्त आहे. कारवाईमुळे रस्ता मोकळा झाला असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. वाडा रस्त्यावर जुना मोटार स्टँड, भाजी मार्केट, शनि-मारुती मंदिर, दिलावर खान दर्गा, महात्मा गांधी विद्यालय आणि कॉलेज यांसारख्या ठिकाणांमुळे विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी गर्दी असते.
माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या प्रयत्नांतून या रस्त्यासाठी 15 कोटी रुपयांचा निधी मिळाला, ज्यामुळे रस्ता रुंद झाला. मात्र, अतिक्रमणांमुळे रुंदीकरणाचा लाभ मिळत नव्हता. स्टॉल्स आणि पार्किंगमुळे रस्ता अरुंद होऊन वाहतूक कोंडी, अपघात आणि वाद निर्माण होत होते. नागरिकांनी वारंवार कारवाईची मागणी केली होती.
मंगळवारी (दि.17) नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंबादास गरकळ यांच्या नेतृत्वाखाली गणेश देव्हरकर, प्रतिकेश सातकर आणि कर्मचार्यांनी बांधकाम विभाग व पोलिसांच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वी केली. यामुळे रस्ता मोकळा झाला असून, वाहतूक आणि पादचारी चालणे सुलभ होईल, अशी अपेक्षा आहे.





