जिल्हा परिषदेने पैसे वर्ग करूनही दोन वर्षे ग्रामपंचायतकडून टाळाटाळ राजगुरूनगर – शिवे (ता. खेड) ग्रामपंचायत अंतर्गत करण्यात आलेल्या कामाचे बिल ठेकेदाराला 2 वर्षे झाली तरी अदा केले जात नसल्याने त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे. त्यांनी बिलाची रक्कम अदा करा असे सांगितले; मात्र त्याची दखल ग्रामपंचायतीने घेतली नाही. ठेकेदाराने काम पूर्ण केले त्याचे मूल्यांकन, एमबी झाली. जिल्हा परिषदेने संबंधित बिलाची रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यात 2 वर्षे झाली वर्ग केली आहे; मात्र ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक ठेकेदाराचे बिल अदा करीत नाहीत. त्यामुळे संबंधित ठेकेदार आर्थिक अडचणीत आला आहे. त्यांनी प्रशासनाला आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. शिवे ग्रामपंचायतीने 29 सप्टेंबर 2023 रोजी चाकण गडद रस्ता ते वनदेव मंदिर असा 202 मीटरचा सिमेंट काँक्रीटचा रस्ता करण्यासाठी 15 लाख रुपये निधीची वर्क ऑर्डर होती. ग्रामपंचायत ठेकेदार होती; मात्र त्यांनी काम न करता सब ठेकेदार म्हणून रमेश येळवंडे (अथर्व कन्स्ट्रक्शन) यांना नेमले. त्यांनी त्यांच्या स्वतःचे सुमारे 14 लाख रुपये लावून हे काम पूर्ण केले. हे काम 29 नोव्हेंबर 2023 रोजी पूर्ण केले. त्यानंतर पंचायत समितीच्या अधिकार्यांनी या कामाचे मूल्यांकन केले. एमबी झाली त्याचा अहवाल जिल्हा परिषदेकडे पाठवला. जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागाने ग्रामपंचायत शिवे यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली. पैसे जमा झाल्यानंतर संबंधित ग्रामसेवकाने 13 लाख 92 हजार 557 रुपयांचा चेक संबंधित ठेकेदाराच्या नावाने काढला; मात्र त्यांना तो अदा केला नाही. येळवंडे यांनी याबाबत गटविकास अधिकारी खेड यांच्याकडे याबाबत पत्रव्यवहार केला. गटविकास अधिकार्यांनी या प्रकरणात 14 फेब्रुवारी 2024 पासून 8 ते 9 सुनावण्या कारण नसताना घेतल्या. त्यानंतर त्याचा अहवाल 10महिन्यानंतर तत्कालीन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नलावडे यांच्याकडे पाठवला. त्यांनी या अहवालावर खेड पंचायत समितीला लेखी कळवले. वर्क ऑर्डर कामाची एमबी पाहून संबंधित ठेकेदाराला बिल अदा करावे, असे गटविकास अधिकार्यांना 13 मार्च 2025 रोजी लेखी स्वरूपात कळवले. ही कारवाई सात दिवसांच्या आत करण्याचे आदेश दिले. गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांनी 19 मार्च 2025 रोजी ग्रामपंचात शिवे यांना स्मरणपत्राने बिल अदा करणेबाबत सांगितले. पुन्हा 2 मे 2025 ला स्मरणपत्र दिले. मात्र ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांनी गटविकास अधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. वेळेत काम केले काम पूर्ण झाल्यानंतर त्याची वर्क ऑर्डर प्रमाणे एमबी झाली जिल्हा परिषेदेने कामाचे पैसे ग्रामपंचायत खात्यात वर्ग केले. काम करून घेतले आता बिल द्यायला ग्रामपंचायत टाळाटाळकरीत आहे माझे देणे वाढले आहे. त्यामुळे आर्थिक संकटात आहे. कामाचे पैसे मिळाले नाही तर जिल्हा परिषद अथवा खेड पंचायतीच्या समितीसमोर आत्महत्या करण्याचा मी निर्णय घेतला आहे. -रमेश येळवंडे, ठेकेदार हे काम ग्रामपंचायत करीत होती. सब ठेकेदार म्हणून येळवंडे यांच्याशी अथवा त्याच्या अथर्व कन्स्ट्रक्शनशी हे काम करण्यासाठी लेखी स्वरूपात करार झाला नाही. या कामाचे टेंडर झाले नाही. काम पूर्ण झाले एम्बी झाली त्याचे पैसे ग्रामपंचायत खात्यावर वर्ग झाले; मात्र याबाबत लेखी स्वरूपात कोणताही व्यवहार नसल्याने हे पैसे येळवंडे यांना दिले नाहीत, देता येत नाहीत. त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रारी केल्या आहेत. त्यावर सुनावणी झाली मात्र वरिष्ठांकडून ठोस पर्याय लिखित स्वरूपात ग्रामपंचायतीला मिळत नाही तोपर्यंत कोणताही निर्णय घेता येणार नाही. -उल्हास कोरडे, ग्रामसेवक शिवे लेखीला टोपली, तोंडीचे पालन सध्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भुषण जोशी यांनी संबंधित ठेकेदाराला त्वरीत निधी अदा करा, अथवा हा निधी जिल्हा परिषदेकडे पाठवा, असे फोनवरुन सांगताच ग्रामविकास अधिकारी उल्हास कोरडे यांनी आलेल्या तोंडी आदेशाने 14 लाखांचा निधी जिल्हा परिषदेकडे पाठवण्याबाबत घाई करुन पत्रव्यवहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. यावरुन वरीष्ठांच्या लेखी आदेशाला केराची टोपली दाखवली होती. आता मात्र उपमुख्यकार्यकारी अधिकारी भूषण जोशी यांच्या फोनवरून दिलेल्या तोंडी आदेशाचे कसे पालन केले, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.