Pune District : वाघोली-भावडी रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू

पुणे मनपा शासन नियुक्त नगरसेवक शांताराम कटके यांची माहिती
वाघोली – वाघोली-भावडी रस्त्यावर अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना दैनंदिन प्रवासात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन, पुणे महापालिकेच्या वतीने सुमारे 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून रस्त्याचे काँक्रिटीकरण व दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले असल्याची माहिती पुणे मनपा शासन नियुक्त नगरसेवक शांताराम कटके यांची दिली.
मधल्या काळात नैसर्गिक व तांत्रिक अडचणींमुळे कामास काहीसा विलंब झाला होता; मात्र संबंधित ठेकेदार, अधिकारी व स्थानिक नागरिकांसोबत रस्त्याची पाहणी करून, नागरिकांच्या सहकार्याने सर्व अडचणी दूर करण्यात आल्या आहेत आणि कामाला वेग मिळाला आहे. एकूण 400 मीटर रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम भैरवनाथ मंदिर ते वाघोली-भावडी हद्दीपर्यंत केले जाणार असल्याची माहिती मनपा शासन नियुक्त नगरसेवक कटके यांनी दिली आहे.
तसेच वाघोली-लोहगाव रोड, वाघोली-केसनंद रोड आणि पुणे-नगर महामार्गावरील स्ट्रीट लाईट्ससाठी पुणे महापालिकेच्या वतीने 75 लाखांचा निधी मंजूर करून स्ट्रीट लाईट्स बसवण्यात आल्या आहेत; परंतु त्यामधील अनेक ठिकाणच्या लाईट्स बंद असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर संबंधित अधिकारी व कर्मचार्यांसह त्वरित पाहणी केली आणि सर्व लाईट्स कार्यान्वित करण्याच्या सूचना करून लाइट्स सुरू करण्यात आल्याचे कटके यांनी सांगितले.
वाघोली परिसरातील विविध वसाहतींसाठी 2 कोटींची अतिरिक्त तरतूद मंजूर करण्यात आली आहे. येत्या महिन्याभरात आवश्यक अशा विविध ठिकाणी नवीन स्ट्रीट लाईट्स बसवण्यात येणार आहेत. त्याबरोबर नागरिकांच्या विविध मुलभूत समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे.
-शांताराम कटके, पुणे मनपा शासन नियुक्त नगरसेवक





