लोणी धामणी : पुणे जिल्ह्यात केळी, अंजीर, आंबा, स्ट्रॉबेरी आणि तेल बियावर्गीय सूर्यफूल व करडई या पिकांच्या निर्यातक्षम उत्पादनासाठी क्लस्टर बेस नियोजन करण्यात येत आहे. यामध्ये उत्पादन वाढीसह प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि निर्यातीसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने सर्व घटकांना सोबत घेऊन सर्वंकष आराखडा तयार करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या आहेत. या सर्व सुविधांसाठी विविध योजनांचे एकत्रीकरण करून तसेच जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन देखील त्यांनी दिले. आंबेगाव तालुक्यातील केळी, आंबा व स्ट्रॉबेरी पिकाचा समावेश करण्यात आला आहे. “केळी पिकाचे जिल्ह्यात १ हजार ६०० हेक्टर क्षेत्र असून ते आगामी वर्षात ३ हजार हेक्टरपर्यंत नेण्याचे, तसेच प्रति हेक्टरी उत्पादनातही वाढ होण्याच्या दृष्टीने लक्ष्य ठेवावे. त्यासाठी केळी लागवडीसाठी इच्छुक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे, त्यांचे प्रशिक्षण आयोजित करणे, दर्जेदार रोपे पुरविणे, पाण्याची व्यवस्था, मातीचे आरोग्य, जैविक आधारित खते, औषधे आदी निविष्ठा, कृषी यांत्रिकीकरण तसेच पीकनिहाय उत्कृष्ट उत्पादन पद्धती, लागवडीपूर्वीची, पिकाच्या काढणीपूर्वीची आणि काढणीपश्चात प्रक्रिया आदींबाबतच्या तंत्र, योजनांची माहिती व प्रत्यक्ष शेतकऱ्यांना त्याबाबतचा लाभ कसा मिळेल आदींचा समावेश प्रशिक्षण सत्रामध्ये करण्यात यावा,” अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. याच पद्धतीने स्ट्रॉबेरी, अंजीर, आंबा आदींवरही लक्ष केंद्रित करण्यात यावे. प्रशिक्षणाची व्यवस्था आत्मा आणि कृषी विज्ञान केंद्रांनी समन्वयाने करावी. शेतकऱ्यांचे या पिकांच्या अनुषंगाने पीकनिहाय दोन दिवसीय प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्रांच्या ठिकाणी २३ एप्रिलपासून आयोजित करण्यात येणार आहे. तरी आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी सदर क्लस्टरमध्ये सहभागी होण्यासाठी गावातील कृषी सहाय्यक किंवा मंडळ कृषी अधिकारी कार्यालय व तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन मंडळ कृषी अधिकारी सोपान लांडे यांनी केले आहे. निर्यातीसाठी गुणवत्तेवर भर द्यावा… परदेशी बाजारपेठेत निर्यातीसाठी तेथील मागणी, कृषिमालाची दर्जा, गुणवत्ता यावर विशेष भर द्यायचा असून, त्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांना निर्यात सुविधा केंद्रांसाठी आवश्यक शीतकरण, निर्यातीसाठी प्रक्रिया केलेला कृषिमाल वाहतूक आदींच्या सुविधा निर्मितीसाठी बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प तथा स्मार्ट, केंद्र शासनाचा कृषी पायाभूत सुविधा निधी, अशा विविध योजनांतून लाभ देण्यात येईल.