घरदांळे, शिंदेवस्ती दरम्यान चार फूट खड्डा चिंबळी – चिंबळी ते माजगाव रस्ता घरदांळे, शिंदेवस्ती दरम्यान चार फूट खचला असून वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करण्याची वेळ आली आहे. जिल्हा परिषदेच्या निधीतून काही वर्षांपूर्वी हा रस्ता करण्यात आला होता. येथील जलजीवनच्या कामाच्या दरम्यान या भागात खोदकाम झाले होते. त्यानंतर पहिल्याच पावसात येथील रस्ता खचला आहे. शिवाय या ठिकाणी पाण्याच्या देखील योग्य निचरा होत नसल्याने भराव वाहून जात आहे. यामुळे येथे सिमेंट रस्ता करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. या रस्त्यावर सुरुवातीच्या आणि शेवटच्या टप्प्यात सिमेंट काँक्रिट झाले आहे.मात्र मध्य भागातील काम बाकी आहे.याबाबत स्थानिकांनी मागणी केल्यानंतर निधी उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. या भागातील रस्त्यासाठी शासनाने निधी देऊन येथील दळणवळणाचा गंभीर बनलेला प्रश तातडीने सोडविण्याची गरज आहे. बारा फूट रस्त्यापैकी चार फूट रस्ता खचला आहे. यामुळे वाहनचालकांना रात्रीच्या वेळी अंधारात वाहने काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. रस्ता खचल्याने मोठ्या प्रमाणात पाणी स्थानिक शेतकर्यांच्या शेतात घुसले आहे. यामुळे त्यांच्या पिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. नागरिकांना जीवनमान जगताना अडचणी होत असताना देखील प्रशासन सुस्त का असाही सवाल आता उपस्थित होत आहे. धोकादायक बनला रस्ता मात्र प्रशासन सुस्तच दोन महिन्यांपासून हा रस्ता खचला आहे; मात्र अद्याप येथे दुरुस्ती करण्यात आलेली नाही. मावळ धरण पुनर्वसनमधून स्थापित करण्यात आलेल्या माजगाव या गावाला जाणारा हा एकमेव मुख्य रस्ता आहे; मात्र तरीही त्याची दुरुस्तीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. शासनाकडे लोकांच्या सामान्य गरजांसाठी देखील पैसे नाहीत का? हा रस्ता दुरुस्त करण्यासाठी निधी दिला जात नाही. जिल्हा परिषद, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग एवढे निधी देऊ शकतील; मात्र तरीही आमच्या अडचणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. – शांताराम घरदाळे, स्थानिक रहिवाशी