Pune District : विद्या प्रतिष्ठानमध्ये चिमुकल्यांनी ईव्हीएमद्वारे केले मतदान

भोर – विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल, भोर येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेचा अनुभव यावा यासाठी मतदान प्रक्रिया शनिवारी (दि.१२) पार पडली. ही निवडणूक प्रक्रिया ईव्हीएम मशीनच्या प्रतिकृतीद्वारे पार पडली. या निवडणूक प्रक्रियेत शालेय विद्यार्थी प्रतिनिधी व हाऊस कॅप्टनची निवड करण्यात आली. यासाठी इयत्ता नववीचे विद्यार्थी व विद्यार्थिनी उमेदवार म्हणून उभे होते.
विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया कशी असते आणि प्रत्यक्ष मतदान कसे केले जाते याची समज व्हावी यासाठी निवडणूक घेण्यात आली होती. त्यामध्ये उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरणे, अर्जाची छाननी करणे, माघार घेणे, प्रचार करणे आणि प्रत्यक्ष मतदान, अशा सर्व प्रक्रिया पारदर्शीपणे पार पाडण्यात आल्या.
कोणत्याही निवडणुकीत ज्या पद्धतीने वातावरण असते अगदी त्या पद्धतीने वातावरण विद्यालयात निर्माण झाले होते. यामध्ये मतदान केंद्र, ईव्हीएम मशीनची प्रतिकृती, मतदान केंद्राध्यक्ष, सहाय्यक अधिकारी, असे सर्व नियोजन करण्यात आले होते. मतदान होण्यापूर्वी उमेदवार, प्रतिनिधी, पोलिंग एजंट तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका या सर्वांच्या समक्ष मॉक टेस्ट घेण्यात आली यानंतर मतदानाला सुरुवात झाली. यावेळी शालेय शिस्तीत मतदान झाले.
केंद्रप्रमुख अधिकारी म्हणून फिरदोस आतार, मतदान अधिकारी संतोष मादगुडे, सचिन दानवले व रवींद्र जगदाळे, किशोर गुजर व साधना जांभळे तसेच मतदान मोजणी अधिकारी दत्तात्रय महांगरे व निवृत्ती खोपडे या शिक्षक वर्गांनी काम पाहिले.
मतदानाच्या वेळी मतदान कक्षाला दत्तात्रय बांदल, अर्जुन खोपडे, स्वप्निल पैलवान, किरण अंबिके तसेच कुंदन झांजले, इत्यादी पत्रकारांनी भरारी पथक म्हणून भेट दिली. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अश्विनी मादगुडे, क्रीडाशिक्षक संतोष मादगुडे, शिक्षिका रागिणी भोसले व अंजली समगीर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.





