भवानीनगर, -श्री छत्रपती साखर कारखाना यावर्षीच्या गाळप हंगामामध्ये ऊस दराच्या बाबतीत इतर साखर कारखान्यांच्या तुलनेत मागे राहणार नाही. त्यामुळे सभासदांनी आपल्या कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस आपल्याच कारखान्याला देऊन कारखान्यांमध्ये जास्तीत जास्त उसाचे गाळप करण्यासाठी सहकार्य करावे. उसाचे गाळप जास्तीत जास्त झाले तर कारखाना कर्जातून बाहेर पडेल. त्यामुळे सर्व सभासद शेतकऱ्यांनी ऊस आपल्याच कारखान्यास गाळपास द्यावा, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी केले. कारखान्याचा 68वा बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रम चिफ केमिस्ट सुनील पाटील व त्यांच्या पत्नी दीपा तसेच डॉ. श्रीकांत ठोंबरे व त्यांच्या पत्नी डॉ. सोनल या उभयतांच्या हस्ते झाला. कारखान्याचे काटा पूजन शेतकी अधिकारी जालिंदर शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. गव्हाण पूजनाचा कार्यक्रम कारखान्याचे संचालक मंडळ सभासद व कामगार यांच्या उपस्थितीत झाला. कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, उपाध्यक्ष अमोल पाटील, साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, अविनाश घोलप, संचालक बाळासाहेब पाटील, ऍड. रणजीत निंबाळकर, ऍड. लक्ष्मणराव शिंगाडे, राजेंद्र गावडे, नारायण कोळेकर, निवृत्ती सोनवणे, दत्तात्रय सपकळ, रसिक सरक, सर्जेराव जामदार, बाळासाहेब सपकळ, अभिजीत रणवरे, डॉ दिपक निंबाळकर, गोपीचंद शिंदे, सुमन दराडे, कार्यकारी संचालक अशोक जाधव, शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अमर कदम सभासद व कामगार उपस्थित होते. काटे म्हणाले, भवानीनगरमध्ये मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरू असून या आंदोलनाला गालबोट लागू नये म्हणून कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन व मोळीपूजन साध्या पद्धतीने करण्याचा संचालक मंडळाने निर्णय घेतला होता. “128 कोटी रुपयांच्या कर्जाला कारखान्याच्या संचालक मंडळाने वैयक्तिक हमी दिली पाहिजे. टनाला साडेतीनशे रुपये कर्जाचा हप्ता जाणार आहे हे पैसे व्यवस्थित वापरले नाही तर त्याचा फटका सभासदांना बसणार आहे. आपल्या काळात ऊसाला चार आकडी भाव व 52 टक्के बोनस देणारा छत्रपती कारखाना राज्यात अग्रगण्य होता. सभासदांपुढे येण्यासाठी संचालक मंडळ घाबरत आहे.” -पृथ्वीराज जाचक, माजी अध्यक्ष राज्य साखर संघ