Pune District : छत्रपती कारखाना येणार्या निवडणुकांचा ठरणार ट्रेलर

इंदापूर : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा घोळ मिटला असून, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येणार्या चारच महिन्यात पार पडतील, असे स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील सात जिल्हा परिषद गटातील नेहमीचेच कलाकार तयारीस लागलेले दिसून येत आहेत, असे असले तरी देखील याच तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक लागली असल्याने व खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्वतः लक्ष देऊन, एक बलदंड पॅनल उभे केले आहे. त्यामुळे या छत्रपती साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल येणार्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा, ट्रेलर असणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे.
इंदापूर तालुक्यात कोणत्या निवडणुकीला काय होईल, हे कोणत्याही राजकीय विश्लेषकाला सांगता येत नाही. कारण येथील जनता जनार्दन, अत्यंत संवेदनशील हुशार असल्यामुळे, नुकत्याच झालेल्या लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकांत निकाल समोर आले. या तालुक्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विचाराची मोठी मांड आहे. राज्याच्या सत्तेत उपमुख्यमंत्री अजित पवार असल्याने प्रत्येक गटातील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या जिद्दीने, राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली विकासकामे करताना दिसत आहेत. छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश घोलप यांनी व त्यांच्या सहकार्यानी छत्रपती कारखान्यात उभे राहिलेले पॅनल यंदा जनतेचा किती आशीर्वाद मिळवते. यावर देखील या भागातील दोन जिल्हा परिषद गटांचा विषय आहे.
त्याचप्रमाणे माजी सहकार मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी मोठी राजकीय अडचण असताना देखील, नीरा भीमा सहकारी साखर कारखाना बिनविरोध करत आपली सहकार क्षेत्राशी असलेली नाळ पुन्हा सिद्ध केलेली आहे. सत्तेत नसल्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्या कामाचा वेग दिसत नसला तरीही, तालुक्यातील सात ही जिल्हा परिषद मतदार संघात कार्यकर्त्याचे टीमवर्क व जाळे मोठे आहे. सन 2014 पासून हर्षवर्धन पाटील आमदार नसले तरी देखील त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेवरील आपला करिष्मा अद्यापपर्यंत जाऊ दिला नाही; मात्र काही दिवसातच, जिल्हा परिषद, पंचायत समिती नगरपरिषद, ग्रामपंचायत यांच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये हर्षवर्धन पाटील कशी राजकीय खेळी खेळणार याकडे लक्ष लागले आहे.
याउलट क्रीडा मंत्री म्हणून अत्यंत चांगली काम करत असणारे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी गावोगावी विकासकामे करण्याची चळवळ मात्र वेगाने वाढवलेली दिसते आहे. सामान्य जनतेची नाळ कसल्याही परिस्थितीत तुटू नये. राज्याची जबाबदारी असतानाही तसेच वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री पद असतानाही, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे आठवड्यातील काही दिवस, आपले इंदापूर तालुक्यासाठी देत आहेत. आरोग्याच्या विषयावर मोठे काम मोठी मदत क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे करताना दिसत आहेत.
प्रवीण माने कोणाकडे?
अपक्ष विधानसभा लढवणारे प्रवीण माने हे भारतीय जनता पार्टी जाणार का? किंवा येणार्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हर्षवर्धन पाटील यांच्या समवेत रणांगणात उडी घेणार, हे आज तरी कोणाला सांगता येणार नाही. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेत, ज्यांच्याकडे प्रवीण माने त्यांची सरशी होईल, असे बोलले जात आहे.
नगरपरिषदेसाठी रणनीती
इंदापूर नगर परिषदेच्या बाबतीत आज बाहेरून हालचाली चाललेल्या दिसत नसतील. तरीदेखील अंतर्गत नगरपालिका निवडणुकीची बांधणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर तसेच कर्मयोगी शंकराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन भरत शहा यांची चाललेली दिसते. तर नागरी संघर्ष समितीच्या माध्यमातून, जनतेचे प्रश्न या संदर्भात माजी उपनगराध्यक्ष प्राध्यापक कृष्णा ताटे यांनी आपली टीम सक्रिय ठेवली आहे.
राजकीय गणितांचा कारखान्यांवर परिणाम नाही
या तालुक्यातील सहकारी तत्त्वावर चालणारे सहकारी साखर कारखाने आहेत. यामधील नीरा भीमा व कर्मयोगी साखर कारखाना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती सहकारी साखर कारखाना आहे. या वीस पंचवीस वर्षात अनेक राजकीय गणिते बदलली, मात्र या तीन कारखान्यांमध्ये कोणताही बदल झालेला अद्यापी दिसला नाही.





