Pune District : चासकमान धरण 82 टक्के भरले

तीन दरवाजे उघडले ः भीमा नदीत 1800 क्युसेकने विसर्ग
राजगुरुनगर – खेड तालुक्यातील पश्चिम भागात सुरु असलेल्या पावसाने भीमा नदीवरील चासकमान धरण 82 टक्के भरले आहे. धरणाचे पाचपैकी तीन दरवाजे उघडण्यात आले असून भीमा नदीत सुमारे 1800 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात झाल्याने भीमा नदी प्रवाहित झाली आहे.
खेडच्या पश्चिम भागात भीमाशंकर भोरगिरी परिसरात संततधार पावसामुळे भीमानदीला थोड्याफार प्रमाणात पूर येत आहे. साधारणतः 3 ते 5 हजार क्युसेक वेगाने येवा चास कमान धरणात येत आहे. भीमाशंकर भोरगिरी परिसरात सुमारे मे महिन्यापासून आतापर्यंत 700 ते 1000 मिमी पाऊस झाला आहे. या पावसाने कळमोडी धरण 100 टक्के भरले तर चास कमान धरण 82 टक्के तर, भामा आसखेड धरण 36 टक्के भरले.
चासकमान धरणातंर्गत कळमोडी दीड टीएमसी क्षमतेचे धरण गेल्या 24 जून रोजी भरल्यानंतर चासकमान धरणात येणार्या पाण्यामुळे धरणसाठ्यात वाढ होण्यास मदत झाली. कळमोडी धरणातुन सध्या 501 क्यूसेसने खाली पाण्याचा विसर्ग सुरु आहे. भीमाशंकर भोरगिरी परिसरात कमी अधिक पाऊस पडत असल्याने धरणातील येवा कमी जात होत आहे
पावसाचे प्रमाण वाढल्यास चास कमान धरणातून जादा क्युसेस वेगाने भीमानदीत पाणी कोणत्याही क्षणी सोडण्यात येणार आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरीकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रांत अनिल दौंडे, तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी केले आहे.





