Pune District : वाहतूक कोंडीमुळे चाकणकर रडकुंडीला

तातडीने उपाययोजना करा ; राष्ट्रवादीचे पोलिसांना निवेदन
चाकण – आंबेठाण चौकात रोज होणार्या वाहतूक कोंडीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे वाहतूक कोंडीने चाकणकर नागरिक अक्षरश: रडकुंडीला आले असून चाकणमधील वाहतूककोंडी थांबणार कधी?
चाकण, आंबेठाण रस्ता, वासुलीफाटा, महाळुंगे,खालूंबरे, तळेगाव एमआयडीसी ला जोडले असल्यामुळे या रस्त्यावर होणारी वाहतूक मोठया प्रमाणात असते. कामगार, शाळेच्या बसेस अशा इतर वाहनांबरोबर अवजड वाहतूक करणार्या वाहनाचे प्रमाण अधिक असल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत असून या मार्गावरून जाणार्या अवजड वाहतूक करणार्या वाहनांना वेळ मर्यादा ठरवून देऊन ही वाहतूक बिरदवडी मार्गे भाम येथे वळवून पुणे-नाशिक रस्त्यावर सोडण्यात यावी, अशा मागण्यांचे निवेदन चाकण शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देण्यात आले.
यावेळी चाकण शहर अध्यक्ष राम गोरे, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष मोबिन काझी, संजय वाघमारे, दत्ता चौधरी, कैलास थोरवे, अनिल देशमुख, दिलावर आतार आदींच्या वतीने चाकण शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश राठोड यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात सुचवलेले मते
चाकण-आंबेठाण रस्त्यावरील वाहतुकी कोंडी दिवसेंदिवस वाढत असल्या कारणामुळे रविवारी (दि. 29) वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रकाश राठोड यांची भेट घेतली व त्यांना प्रायोगिक तत्त्वावर जड वाहने ही सकाळी सात ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत बिरदवडी मार्गे भामकडे मार्गक्रमण करणे तसेच बिरदवडी चौक आंबेठाण चौक व पुणे-नाशिक महामार्ग येथील भाम चौक या तिन्ही ठिकाणी चक्राकार पद्धतीने जड वाहनांची एकेरी पद्धतीने करण्यात यावी, असे निवेदन देण्यात आले. या संदर्भात पोलीस अधिकारी राठोड यांनी वरिष्ठाचे मार्गदर्शन घेऊन पुढील दोन ते दोन ते तीन दिवसांत याबाबत योग्य निर्णय घेण्यात येईल असे सांगितले.





