Pune District : कदमवाकवस्तीत सदनिका फोडून रोख रकमेसह दागिने लंपास

लोणी काळभोर – कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या हद्दीतील घरी कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी सदनिका फोडून रोख रकमेसह 3 तोळे सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू लंपास केल्या आहेत. ही घटना सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.
या प्रकरणी मंगेश तुकाराम मोहिते (वय 29, रा. प्रथमेश अपार्टमेट, कदमवाकवस्ती,) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगेश मोहिते हे त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त कुटुंबासह शनिवारी (दि. 20) बाहेरगावी गेले होते.
ते त्यांचे काम आटोपून सोमवारी (दि. 22) सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास घरी आले. तेव्हा त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले आढळून आले.
त्यांनी घरात जाऊन पाहणी केली असता, बेडरुमध्ये असलेल्या लाकडी कपाटाचे कुलूप तोडून आतील लॉकरचे लॉक तुटलेल्या अवस्थेत आढळून आले. कपाटातील सोन्याचे नेकलेस, कर्णफुल, तीन सोन्याच्या अंगठ्या, सोन्याची 3 नथ, छल्ला, पैंजण, चांदीची चैन, चांदीच्या 3 अंगठ्या व रोख 30 हजार रुपये असा मुद्देमाल चोरून नेला.





