रमेश जाधव
रांजणी – ग्रामीण भागात बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू झाल्याने येथील बेरोजगारांना आता रोजगार मिळू लागला आहे . ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळत असल्याचे चित्र दिसून येते . बैलगाडा शर्यतीसाठी ट्रॅक्टर, दुचाकी, बुलेट अशा प्रकारची मोठी बक्षिसे ठेवली जातात. दोन ते पाच दिवस या बैलगाड्याच्या शर्यती चालत असल्यामुळे हॉटेल, रसवंतीग्रह, वाजंत्री यांना आता सुगीचे दिवस प्राप्त होऊ लागले आहेत.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा छंद म्हणून जोपासल्या जाणाऱ्या बैलगाडा शर्यतीवरील बंदी काही महिन्यांपूर्वी उठवली आणि शेतकऱ्यांमध्ये एकच जल्लोष झाला. मात्र, पूर्वीच्या बैलगाडा शर्यती आणि आत्ताच्या बैलगाडा शर्यती यांमध्ये आमूलाग्र बदल दिसून येत आहे. ग्रामीण भागातील बैलगाडा शर्यती देखील आता हायटेक झाल्या आहेत . खेडोपाडी होणाऱ्या बैलगाडा शर्यती थेट ऑनलाइन पद्धतीने दाखवल्या जात आहेत, त्यामुळे घरात बसूनही बैलगाडा शर्यती लोकांना आता पाहायला मिळत आहेत. विशेषत: तरुण वर्गाचा हायटेक बैलगाडा शर्यतींना मोठा प्रतिसाद मिळत असून, या माध्यमातून अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून बैलगाडा शर्यतीवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी आणल्यापासून सुमारे आठ ते दहा वर्षे बैलगाडा शर्यती बंद होत्या . मात्र, काही महिन्यांपूर्वी बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठली आणि या बैलगाडा शर्यती ग्रामीण भागातील खेडोपाडी पुन्हा होऊ लागल्या आहेत; परंतु सध्याच्या बैलगाडा शर्यतीचे चित्र पाहिले तर बैलगाडा शर्यतींना हायटेकचे स्वरूप प्राप्त झाले आहे .अनेक वर्षापासून ग्रामीण भागातील बैलगाडा शर्यतींना मोठी परंपरा आहे.
प्रशासनाने बैलगाडा शर्यतींना परवानगी देताना नियम आणि अटींचे पालन करण्याची सक्ती केल्याने बैलगाडा मालक देखील या नियमांचे पालन करताना दिसून येतात हे मात्र विशेष आहे, त्यामुळे संयोजकांकडून नियमांचे काटेकोरपणे पालन करत बैलगाडा शर्यती मोठ्या उत्साहात ग्रामीण भागात पार पडताना दिसतात. बैलगाडा शर्यती या रांगड्या खेळाची सध्याच्या तरुण वर्गात चांगली क्रेझ पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग बैलगाडा शर्यतींच्या खेळाकडे आकर्षित झाला आहे. बैलगाडा मालकांकडून गाडा जुंपणाऱ्या तरुणांना आकर्षक गणवेश देखील आता दिले जात आहेत. सध्याचा जमाना हा मोबाइल आणि इंटरनेटचा आहे.
खेडोपाडी होणाऱ्या बैलगाडा शर्यतीचे लाईव्ह प्रक्षेपण दाखवले जाते त्यामुळे बैलगाडा शर्यती या घरबसल्या तसेच कुठूनही पाहता येतात. संयोजकांकडून शर्यतीच्या घाटामध्ये खास शूटिंग केले जाते त्या माध्यमातून तरुणांना देखील आता चांगला रोजगार मिळू लागला आहे . धावत्या बैलगाडा शर्यतीचे सेकंद पहाण्यासाठी घाटात डिजिटल स्क्रीन लावली जात असल्याचे चित्र पाहायला मिळते तसेच पहाडी आवाजासाठी डिजिटल साऊंड सिस्टिमचा देखील आता वापर होऊ लागला आहे .
टोकन देखील आता ऑनलाइन पद्धतीने
मुळातच गेल्या काही महिन्यांपासून बैलगाडा शर्यतींना हायटेकचे स्वरूप प्राप्त झाल्याने अलीकडील काळात शर्यतीसाठी नाव नोंदणीचे टोकन देखील आता ऑनलाइन पद्धतीने मिळू लागले आहे. शिवाय बक्षीस वाटपही काही ठिकाणी ऑनलाइन करण्याचा प्रयोग सुरू झाला आहे . साहजिकच पूर्वीच्या आणि आताच्या बैलगाडा शर्यतीमधील फरक पाहिला तर सध्याच्या बैलगाडा शर्यती या हायटेक स्वरूपाच्या झाल्याने प्रत्यक्ष घाटात जरी या शर्यती पाहता आल्या नाही तरीदेखील त्या घरबसल्या मोबाईलवर पाहता येऊ शकतात.