Pune District : तीर्थक्षेत्र रामदरा रस्त्यावरील पूल अवजड वाहतूकीसाठी बंद

लोणी काळभोर – येथील तीर्थक्षेत्र रामदरा परिसराकडे जाणारा व 60 वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेला नवीन मुठा कालव्यावरील पूल अखेरची घटका मोजत असल्याची बातमी दैनिक प्रभातमध्ये प्रसिद्ध झाली. या बातमीनंतर आज भर पावसात प्रशासन पातळीवरील हालचाली जोरदार सुरु झाल्या आहेत. आज जलसंपदा विभागामार्फत त्या ठिकाणी हा पूल अवजड वाहतूकीसाठी बंद करण्यात आल्याचा फलक लावण्यात आला आहे.
आज या पुलाला जलसंपदा विभागाच्या शाखा अभियंता पल्लवी जोशी, कालवा निरीक्षक कांताराम सुपे, भाऊसाहेब हरपळे, लोणी काळभोर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच योगेश काळभोर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष युवराज काळभोर, सचिन काळभोर, सनी वलठे, हवेली पंचायत समितीचे शाखा अभियंता अभिषेक धुमाळ, ग्रामविकास अधिकारी एस. एन. गवारी यांनी या ठिकाणी भेट दिली.
यावेळी पल्लवी जोशी यांनी सांगितले की, हा पूल अत्यंत कमकुवत झाला आहे. त्यामुळे या पुलावरून अवजड वाहतूकीस बंदी घालण्यात आली आहे. या संदर्भातील पत्र आजच लोणी काळभोर ग्रामपंचायत व पोलीस ठाण्यात देणार आहे. तीन वर्षांपूर्वी खासदार अमोल कोल्हे यांनी हा पूल लोणी काळभोर ग्रामपंचायतीकडे वर्ग करावा अशी सूचना केली होती. या पुलाच्या जागी बांधण्यात येणार्या नवीन पुलाच्या आरेखनाला मंजूरी मिळाली असून निधी प्राप्त होताच काम सुरु करण्यात येणार आहे.
यावेळी योगेश काळभोर म्हणाले तीन वर्षांपूर्वी फुरसुंगी ते कुंजीरवाडी दरम्यान पाच पुलांना मंजूरी देण्यात आली असून त्यापैकी तीन पुल पूर्ण झाले असून दोन पुलांचे काम होणे बाकी आहे. काम होणे बाकी असलेल्या पुलांमध्ये तीर्थक्षेत्र रामदरा रस्त्यावरील पुलाचा समावेश आहे. या पुलाचे काम पुर्ण व्हावे म्हणून लोणी काळभोर ग्रामपंचायत संपूर्ण सहकार्य करणार आहे.
युवराज काळभोर म्हणाले या संदर्भात आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे आमचा पाठपुरावा चालू आहे. आमदार कटकेही या पुलाच्या कामा संदर्भात गांभीर्याने शासनस्तरावर प्रयत्नशील आहेत. लवकरच या पुलाचे काम सुरु होईल असा शब्द आमदारांनी दिला आहे. जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ आधिका-यांशी आमदार कटके सतत संपर्कात आहेत. आमदारांच्या प्रयत्नांमुळे लवकरच निधी मंजूर होऊन या पुलाचे काम सुरु होणार आहे.





