पुणे जिल्हा : कट्टरतेच्या सर्व भिंती तोडून भारत एकसंध बनवा

आळंदीत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे आवाहन
आळंदी – संपूर्ण विश्वाला भारताची गरज आहे. आपले ज्ञान आणि विज्ञान ही आपली परंपरा आहे. हे ज्ञान आपल्याला विश्वाला द्यायचे आहे. त्यामुळे कट्टरतेच्या सर्व भिंती तोडून एकसंध, एकरस, सुखी सुंदर भारत बनवणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
श्रीक्षेत्र आळंदी येथील स्वामी गोविंददेव गिरी महाराजांच्या गीताभक्ती अमृत महोत्सवी कार्यक्रमाचा शुभारंभ डॉ. भागवत यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी स्वामी गोविंददेव गिरी महाराज, जैन मुनी लोकेश महाराज, वारकरी शिक्षण संस्थेचे मारुती महाराज कुऱ्हेकर, राजेंद्रदास महाराज आदी उपस्थित होते.
डॉ. भागवत म्हणाले की, अयोध्येत 22 जानेवारीला श्रीरामलला विराजमान झाले आहेत. जे-जे मंगल घडते आहे ती ईश्वराची इच्छा आहे. देशातील महापुरुष, संत महात्म्यांच्या सामर्थ्य आणि पुरुषार्थामुळे हे शक्य होत आहे. ही नियतीची योजना आहे, जे झोपले आहेत त्यांना जागे करण्यासाठी संत कायम प्रयत्नरत असतात.
ग्रामीण भागातील बांधव हे संपूर्ण विज्ञान तंत्रज्ञान समजू शकत नाही, असे अनेकांना वाटते; परंतु ते जुन्या काळापासून अनेक छोटेछोटे विज्ञाननिष्ठ प्रयोग करीत असतात हे अनेकवेळा सिद्ध झाले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीक्षेत्र अयोध्या येथे प्रकाशित केलेले डाक तिकीट स्वामी गोविंद देवगिरी महाराजांना यावेळी भेट म्हणून पाठवले. भाजपचे माजी उपाध्यक्ष शाम जाजू, आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत डॉ. मोहन भागवत यांनी ते प्रदान केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गीता परिवाराचे संजय मालपाणी यांनी प्रास्ताविक गिरिधर काळे यांनी तर आनंद राठी यांनी आभार मानले.
आपले मूळ विसरू नये
श्रद्धा, भक्ती आणि समर्पण हे जनमानसात असणारे गुण आहेत. त्यात सातत्य ठेवण्याचे काम संत, विद्वान करत असतात. त्यामुळेच संत ज्ञानेश्वरांनी ईश्वर निष्ठाची मांदियाळी मागितली आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा असे स्पष्ट केले. जग बदलत असले तरी आपण आपले मूळ विसरू नये. ज्ञान आणि विज्ञान याची आपल्याकडे परंपरा आहे. आपल्याला विश्वाला ज्ञान द्यायचे आहे. भारत विश्वगुरू होण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नरत राहायला हवे, असे मोहन भागवत यांनी नमूद केले.





